कवठेमहांकाळ : लोकप्रतिनिधींचा नाकर्तेपणा, आरोग्य विभागाचे सपशेल फसलेले नियोजन यामध्ये तालुक्याच्या श्वास गुदमरत आहे. तालुक्यात दररोज कोरोनाचे शंभर रुग्ण आढळून येत असले तरी संपूर्ण तालुक्यात केवळ ७० बेड उपलब्ध आहेत.
तालुक्यात आजअखेर कोरोना रुग्णांची संख्या ५,०३७ वर गेली आहे. गेल्या तीन महिन्यात तब्बल ३ हजार रुग्ण सापडले आहेत, तर ८५ जणांचा मृत्यू झाला. कदमवाडी, नागज, शिंदेवाडी (घो.), हिंगणगाव, रांजणी, कोकळे, कोगनोळी, कुची, आरेवाडी, थबडेवाडी, कवठेमहांकाळ शहर, दुधेभावी, देशिंग ही गावे कोरोनाची हॉटस्पॉट ठरत आहेत.
आरोग्य यंत्रणा मात्र अतिशय तोकडी आहे. शहरातील उपजिल्हा रुग्णालयात एकूण ५५ बेड आहेत. यामध्ये ४० ऑक्सिजन बेड, सात ते आठ व्हेंटिलेटर बेड, तर चार नॉन ऑक्सिजन बेड, तर तीन आयसीयू बेड आहेत. ढालगाव येथे शासनाने २५ ऑक्सिजन बेडचे कोरोना सेंटर उभारले आहे. तालुक्यात फक्त सत्तर बेड उपलब्ध आहेत. रोजचे कोरोना रुग्णाचे प्रमाण शंभरावर आहे.
कवठेमहांकाळला उपजिल्हा रुग्णालय असल्याने शेजारच्या जत तालुक्यातील रुग्णही येतात. परंतु तोकडे बेड, ढासळलेली आरोग्य यंत्रणा यामुळे मिरज, सांगलीकडे रुग्ण पाठवले जात आहेत. खासगी कोविड सेंटर जोमात आहेत. तेथे जीव वाचवण्यासाठी वाटेल ती किंमत मोजावी लागते आहे.
मतदारसंघाच्या आमदार सुमनताई पाटील फक्त आढावा बैठकीला हजेरी लावत आहेत. जिल्हा बँकेचे संचालक आणि राष्ट्रवादीचे नेते सुरेश पाटील यांना ‘घराबाहेर दाखवा आणि लाखोंचे बक्षीस मिळवा’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.
चौकट
तालुक्याचे ५० लाख गेले कोठे?
ऑक्सिजन प्लांट नाही, बेड नाहीत, मग तालुक्याला उपाययोजनांसाठी मिळालेले ५० लाख गेले कोठे, असा सवाल लोक विचारत आहेत.
चौकट
उपजिल्हा रुग्णलाय प्रमुखांची डबल सेवा!
उपजिल्हा रुग्णलायाचे प्रमुख डॉ. सतीश गडदे यांना खासगी रुग्णालय सांभाळून शासकीय रुग्णलायात ‘सेवा’ देण्याचे काम आहे. ते केवळ आमदार, खासदार आले की पुष्पगुच्छ घेऊन पुढे असतात. त्यांना रुग्णालयातील माहिती देण्यासही वेळ नसतो.