सांगली : रक्तदान, नेत्रदान अशा गोष्टींसाठी आता जागृतीचे काम पुढे गेले असून समाजाची या दानप्रक्रियेबद्दलची मानसिकताही बदलली आहे, मात्र त्वचादान या गोष्टीबद्दल अद्याप तितका प्रचार आणि प्रसार झाला नाही. तरीही सांगलीच्या वृत्तपत्र विक्रेत्या असलेल्या सुशिला माळी यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलांनी त्यांची ३३ टक्के त्वचादान केले. सांगलीतील हे पहिलेच त्वचादान असून रोटरी स्कीन बँकेने माळी कुटुंबियांच्या या समाजकार्याला सलाम केला आहे.सुशिला माळी यांनी तब्बल ८ वर्षे वृत्तपत्र विक्रीचा व्यावसाय केला. त्यांचा मुलगा नारायण माळी हेसुद्धा वृत्तपत्र विक्रेते आहेत. समाजसेवेप्रती त्यांची आस्था विक्रेत्यांमध्ये परिचित आहे. एखाद्या वृत्तपत्र विक्रेत्याच्या घरी कोणाचे निधन झाले तर नारायण माळी हे त्याठिकाणी तातडीने जाऊन नेत्रदानाबद्दल संबंधित कुटुंबाचे प्रबोधन करीत असतात. त्यांच्या या प्रबोधन कार्यातून अनेक वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कुटुंबियांत नेत्रदान पार पडले आहे. २000 मध्ये नारायण यांनी त्यांच्या आजीचेही नेत्रदान केले होते. गेल्या वीस वर्षाहून अधिक काळ ते दानप्रक्रियेच्या या चळवळीत कार्यरत आहेत.
आईच्या निधनानंतर त्यांनी नेत्रदानाबरोबरच त्वचादान केले. सुशिला माळी यांच्या शरिरातील ३३ टक्के त्वचा स्कीन बँकेत जमा केली आणि समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला. त्यांच्या या कार्याचे कौतुक रोटरीसह अनेक सामाजिक संघटना करीत आहेत.