सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक उलाढाल ४२ कोटींच्या घरात असतानाही अद्याप याठिकाणी पॅनेलवरील सचिव नियुक्ती मात्र करण्यात आलेली नाही. प्रशिक्षित, मान्यताप्राप्त सचिवांची नियुक्ती रखडल्याने नवीन उपक्रम मात्र ठप्प झाले आहेत. स्वच्छ व कायदेशीर कारभारासाठी पॅनेलवरील सचिव नियुक्तीची मागणी होत आहे. प्रशिक्षित सचिव पॅनेल जे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तयार झाले आहेत, ते बाजार समित्यांमध्ये नियुक्त करण्यात यावेत, असे आदेश यापूर्वीच केंद्र शासनाने दिला आहे. या पॅनेलमधूनच सचिवांची नियुक्ती करण्यात यावी, हे बंधनकारक करण्यात आले आहे. असे असतानाही याकडे डोळेझाक करण्यात आली आहे. सांगलीसह ३५ बाजार समित्यांवर पणन मंडळातील अधिकाऱ्यांनी अपात्र सचिवांची नियुक्ती केली आहे. सांगली बाजार समितीच्या यापूर्वीच्या सचिवांची नियुक्ती कायम करण्यात यावी, यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने ठराव करून तो पणन मंडळाकडे पाठविला होता. तो मंजूर झाल्याने यापूर्वीच्याच सचिवांची नियुक्ती कायम झाली आहे. यामुळे सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती तरुण, प्रशिक्षित व मान्यताप्राप्त सचिवांपासून वंचित राहिला आहे. बाजार समितीमध्ये दोन वर्षांपूर्वी ४० ते ५० लाखांचा अपहार झाला होता. लेखापरीक्षणामध्ये ही बाब स्पष्ट झाल्यानंतर यामधील काही रकमाही भरून घेण्यात आल्या आहेत. दोषी दोघा कर्मचाऱ्यांनाही निलंबित करण्यात आले होते. याप्रकरणी दोषी धरून शासनाने सांगली बाजार समितीच बरखास्त करून यावर प्रशासक नेमला आहे. येत्या जानेवारीला प्रशासक नेमून दोन वर्षे पूर्ण होत आहेत. एवढ्या कालावधीसाठी पहिल्यांदाच प्रशासक नियुक्त झाला आहे. मान्यताप्राप्त सचिवांच्या ताब्यात संस्था असती तर कदाचित हा गैरव्यवहार टळला असता. पॅनेलवरील सचिव नसल्यामुळे नावीन्यपूर्ण उपक्रमांपासून समिती मुकली आहे. शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या विविध योजना, प्रबोधन शिबिरेही राबवली जात नाहीत. यामुळे नव्या योजनांपासून शेतकरी वंचित रहात आहेत. कायद्याच्या कलमांमध्ये बदल करून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सचिवांच्या नेमणुकांचे अधिकार पणन खात्याने हाती घ्यावेत, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)केवळ सेस गोळा करण्याचे काम सध्या बाजार समितीकडून केवळ सेस गोळा करणे व तो खर्च करणे इतकेच काम होत आहे. नव्या उपक्रमासाठी प्रशिक्षित व तोट्यातून बाहेर काढणाऱ्या सचिवांची गरज निर्माण झाली आहे. शेतकरी व व्यापाऱ्यांना नव्या योजनांचा लाभ देण्याची गरज निर्माण झाली आहे. सांगली कृषी बाजार समिती ‘अ’ गटात आहे. त्यामुळे याठिकाणी स्पर्धा परीक्षा देऊन निवड झालेला सचिव नियुक्त करणे आवश्यक आहे. अभ्यासू उपनिबंधक दर्जाचा अधिकारी नियुक्त झाल्यास होणारे गैरव्यवहार टळतील शिवाय समितीचा कारभार कायदेशीर बाबी सांभाळून होईल. त्याचबरोबर शेतकरी, व्यापाऱ्यांना नव्या योजनांचा, उपक्रमांचा लाभ मिळण्यास मदत होईल. - प्रकाश जमदाडे, माजी सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, सांगली
पॅनेलवरील सचिव नियुक्तीअभावी नवे उपक्रम ठप्प
By admin | Updated: November 21, 2014 00:27 IST