सांगली : जिल्ह्यातील भाजप आपण चालवित असल्याचा कोणाचा गैरसमज झाला असेल, तर त्याला इलाज नाही. आम्ही आमचाच राष्ट्रवादी पक्ष वाढविण्याचे काम करीत आहोत, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे गटनेते आमदार जयंत पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केले. दुष्काळी भागातील लोकांना खुल्या मनाने आणि सढळ हाताने मदत करण्याची राज्य सरकारची भावना नाही,असा आरोपही त्यांनी केला. आ़ पाटील यांनी जत तालुक्यातील डफळापूर, संख, उमदी, जत आदी दुष्काळी गावांचा दिवसभर दौरा केल्यानंतर सांगलीत जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन दिले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सांगली जिल्ह्यातील भाजप आपण चालविता? असे खासगीत बोलले जाते. या प्रश्नाला उत्तर देताना पाटील म्हणाले की, पक्षीय पातळीवर आम्ही आमचाच पक्ष वाढविण्याचे काम करीत आहोत. काहींच्याबरोबर व्यक्तिगत संबंध असू शकतात़ मात्र कोणाचा गैरसमज झाला असेल, तर त्याला इलाज नाही़ पूर्वीच आमच्या पक्षातून काहीजण भाजपमध्ये गेले आहेत़ त्यात कोणाचा काय फायदा? मला माहीत नाही़ त्यानंतर कोणाच्या मदतीचा प्रश्नच नाही, असेही ते म्हणाले. राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असताना, राज्य शासनाने तातडीने यंत्रणा राबवून लोकांना मदत करण्याची गरज आहे़ मात्र तसे होताना दिसत नाहीत़ मुख्यमंत्री, अर्थमंत्री विदर्भातील आहेत़ त्यांची १०-१५ वर्षातील भाषणे पाहता, पश्चिम महाराष्ट्रावर सूड उगविला जात असल्याच्या शंकेला वाव असल्याचे पाटील यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. (प्रतिनिधी)‘म्हैसाळ’चे पाणी द्या म्हैसाळ योजनेतून भोकरचौंडी, डोर्ली, अंकले, बसाप्पावाडी, कोकळे, बेळुंखी, शिंगणापूर, बिरनाळ आदी तलावात पाणी सोडावे, संख येथील निकृष्ट दर्जाच्या कोल्हापूर बंधाऱ्याची तातडीने दुरूस्ती करावी, बिरूळची उर्वरित कामे पूर्ण करून डफळापूर गावांना पाणी देण्यात यावी अशी कामे निवेदनात सूचवण्यात आली आहे.
भाजप आम्ही चालवत असल्याचा गैरसमज
By admin | Updated: September 1, 2015 22:22 IST