अर्जुन कर्पे - कवठेमहांकाळ -म्हैसाळ पाणी योजनेच्या वीज बिलाची थकबाकी मोठी असल्याने जत, कवठेमहांकाळ, मिरज व तासगावच्या काही भागास दुष्काळाचा फटका सोसावा लागत आहे. शेतकऱ्यांनी पाणीपट्टी न भरल्याने म्हैसाळ योजनेचे पाणी या तालुक्यांना मिळणे अवघड झाले आहे. याबाबत तोडगा काढण्याच्यादृष्टीने महांकाली साखर कारखान्याचे अध्यक्ष विजय सगरे यांनी जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांच्या अध्यक्षांची बैठक रविवार, दि. १५ रोजी बोलाविली आहे. ‘पाणीपट्टी भरू आणि दुष्काळावर मात करू’ असा नारा त्यांनी दिला आहे. या बैठकीतील तोडग्याकडे शेतकऱ्यांसह दुष्काळी भागाचे लक्ष लागले आहे. अनेक वर्षांपासून दुष्काळाच्या खाईत असणाऱ्या जत, कवठेमहांकाळ, मिरज आणि तासगाव या तालुक्यांना बाहेर काढण्यासाठी विठ्ठलदाजी पाटील यांनी वसंतदादा पाटील यांच्या सहकार्याने म्हैसाळ पाणी योजनेला जन्म दिला. त्यानंतर शिवाजीराव शेंडगे, नानासाहेब सगरे, अजितराव घोरपडे, आर. आर. पाटील यांनी शेतकऱ्यांच्या शिवारात कृष्णेचे पाणी आणले. ही योजना बारमाही सुरू ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वीज पुरवठा करावा लागतो. परिणामी वीज बिलाची रक्कमही वाढते.या योजनेचे पाणी वापरणाऱ्या शेतकऱ्यांनी त्याची ठरलेली पाणीपट्टी भरणे आवश्यक आहे. मात्र शेतकऱ्यांनी ती भरलेली नसल्याने वीज बिलाची थकबाकी कोटीच्या घरात पोहोचली आहे. राज्यात पूर्वीच्या आघाडी सरकारमधील आर. आर. पाटील व डॉ. पतंगराव कदम यांच्या सततच्या प्रयत्नामुळे टंचाई निधीतून या योजनेचे वीज बिल भरण्यात येत होते. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याची तोशीस लागली नाही. आर. आर. पाटील यांनी तर तब्बल तीन वर्षे राजकीय ताकद पणाला लावत ही योजना सुरु ठेवली. मात्र आता सत्तेवर आलेल्या भाजप-सेना सरकारने थकबाकी भरण्यास सांगितले आहे.म्हैसाळ योजना अविरतपणे चालू राहण्यासाठी शेतकऱ्यांनी शासकीय नियमानुसार पाणीपट्टी भरून शासनास मदत करणे गरजेचे आहे. परंतु पाणीपट्टी भरण्याची मानसिकता अद्याप शेतकऱ्यांमध्ये पूर्णपणे तयार झालेली दिसून येत नाही. वापरलेल्या पाण्याची पाणीपट्टी भरल्यास या योजनेचे वीज बिल प्रशासनाला भरता येईल व ही योजना कायम सुरू राहील. योजना कायम सुरू राहिल्यास शेतीला बारमाही पाणी मिळून येथील शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडणार आहे, हे अद्याप शेतकऱ्यांच्या लक्षात आलेले दिसून येत नाही. त्यामुळे या सर्व प्रश्नांवर मार्ग काढून या जत, कवठेमहांकाळ, मिरज, तासगाव या दुष्काळी पट्ट्यातील शेती व शेतकऱ्यांना तारण्यासाठी तालुक्याचे प्रमुख विकास केंद्र असलेल्या महांकाली कारखान्याने व राष्ट्रवादीचे तालुक्याचे नेते विजयराव सगरे यांनी पुढाकार घेतला आहे. या योजनेच्या टप्प्यात येणाऱ्या कार्यक्षेत्रातील वसंतदादा पाटील कारखाना, मोहनराव शिंदे कारखाना, जत कारखाना अन् महांकाली कारखाना यांचे अध्यक्ष तसेच मिरज, कवठेमहांकाळ, जत, तासगाव तालुक्यांचे तहसीलदार, प्रांत व म्हैसाळ योजनेचे अधिकारी यांची संयुक्त बैठक ‘महांकाली’च्या कार्यस्थळावर रविवार, दि. १५ फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. या बैठकीत ज्या कारखान्यांकडे म्हैसाळ याजनेच्या ओलिताखालील सिंचन क्षेत्रावरील ऊस गाळप केला जाईल, त्या कारखान्याकडे त्या शेतकऱ्यांच्या बिलातून शासकीय नियमानुसार पाणीपट्टी वसूल करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी म्हैसाळ योजनेच्या पाण्यावर डाळिंब, द्राक्षे, केळी, ज्वारी, इतर फळबागा व बागायती शेती केली आहे, त्या शेतकऱ्यांकडून रेव्हेन्यू (महसूल) विभागाकडूनही पाणीपट्टी नियमानुसार वसूल करण्याचा निर्णयही घेण्यात येणार आहे. जे शेतकरी म्हैसाळ योजनेचे पाणी वापरून पाणीपट्टी भरण्यात असमर्थता दर्शवतील, अशा शेतकऱ्यांवर महसूल विभागाचे अधिकारी निर्णय घेऊन त्यांच्या सात-बारावर नियमानुसार पाणीपट्टीचा बोजा चढविण्याचा निर्णय घेतील, यावरही या बैठकीत चर्चा होणार आहे. एकूणच दुष्काळी परिस्थितीतील शेती व शेतकऱ्यांचा विचार करता, म्हैसाळ योजना बारमाही होणे ही येथील शेती व शेतकऱ्यांची निकडीची गरज आहे. परंतु शेतकऱ्यांनीही म्हैसाळ योजनेच्या पाण्यामुळे शेतीतून आर्थिक उत्पन्न निघत असेल, तर स्वत:च्या प्रगतीसाठी पाणीपट्टी भरणे गरजेचे आहे. ही पाणीपट्टी भरण्यास ही योजना कायमस्वरुपी सुरू राहून दुष्काळ हटविणार आहे. अन्यथा शेतकऱ्यांच्या असहकार्यामुळे परत पाणी उशाला अन् कोरड घशाला म्हणत कृत्रिम मानवनिर्मित दुष्काळाला सामोरे जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार आहे, असेच म्हणावे लागेल.म्हैसाळ योजना कायमस्वरुपी सुरू ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी पाणीपट्टी भरणे गरजेचे असून, यामुळे येथील शेती बारमाही होऊन दुष्काळ हटेल व आर. आर. आबांच्या स्वप्नातील हिरवागार तालुका निर्माण होईल.- विजय सगरे, अध्यक्ष, महांकाली कारखानायोजना बारमाही होण्याची गरज म्हैसाळ योजना बारमाही होणे ही येथील शेती व शेतकऱ्यांची निकडीची गरज आहे. या योजनेचे पाणी वापरणाऱ्या शेतकऱ्यांनी त्याची ठरलेली पाणीपट्टी भरणे आवश्यक आहे. मात्र शेतकऱ्यांनी ती भरलेली नसल्याने वीज बिलाची थकबाकी कोटीच्या घरात पोहोचली आहे. वापरलेल्या पाण्याची पाणीपट्टी भरल्यास या योजनेचे वीजबिल प्रशासनाला भरता येईल व ही योजना कायम सुरू राहील. योजना कायम सुरू राहिल्यास शेतीला बारमाही पाणी मिळून येथील शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडणार आहे, हे शेतकऱ्यांच्या लक्षात आलेले दिसून येत नाही.
‘म्हैसाळ’चे थकित वीज बिल कोटीत
By admin | Updated: February 13, 2015 22:53 IST