नरेंद्र रानडे - : प्लॅस्टिक पिशव्यांचा उपक्रमास फटका सांगली गणेशोत्सवात सांगली, मिरज आणि कुपवाडमधून तब्बल ९0 टन निर्माल्य जमा झाले आहे. निर्माल्यापासून खत निर्मिती करण्यासाठी महापालिकेने निर्माल्य सांगली-मिरज रस्त्यावरील कृषी महाविद्यालय आणि मिरज-पंढरपूर रस्त्यावरील बसवेश्वर उद्यानातील खड्डयात टाकण्याचे ठरवले होते. मात्र कृषी महाविद्यालयात अस्तावस्त टाकण्यात आलेल्या निर्माल्याची दुर्गंधी सुटण्यास प्रारंभ झाला असून, त्यामध्ये प्रचंड प्रमाणात प्लॅस्टिक पिशव्या आढळून आल्याने त्यापासून खत निर्मिती होणे अशक्य आहे. महापालिका आणि सामाजिक संघटनांच्या जनजागृतीमुळे यंदा गणेशभक्तांनी निर्माल्य नदीत विसर्जित न करता निर्माल्य कलशात जमा केले आहे. त्याचवेळी तेथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी ते पिशव्यांतून वेगळे करणे गरजेचे होते. परंतु त्याकडे दुर्लक्ष केले. कृषी महाविद्यालयाच्या मागील बाजूस सुमारे पन्नास बाय पन्नास आणि पाच फूट खोल खड्डा करून त्यामध्ये महापालिका प्रशासनाने निर्माल्य टाकले आहे. खड्डा भरल्यानंतरही परिसरातच निर्माल्य विसर्जित करण्यात आले. पावसाची रिपरिप सुरू असल्याने आता उघड्यावर पडलेले निर्माल्य कुजण्यास सुरुवात झाली आहे. पर्यावरण रक्षणासाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्लॅस्टिकच्या पिशव्यांमधून निर्माल्य वेगळे करण्याचा प्रयत्न केला असला, तरी त्याला यश आलेले नाही. निर्माल्यामध्ये प्लॅस्टिकचा समावेश नसता, तर ठराविक कालावधीनंतर त्याचा उत्तम खत म्हणून उपयोग झाला असल्याचे मत पर्यावरणरक्षकांनी व्यक्त केले आहे. नियोजनाअभावी बसला फटका महापालिका प्रशासन निर्माल्यापासून गांडूळ खत आणि सेंद्रिय खत तयार करणार असल्याचे सांगत असले, तरी खत निर्मिती होणे अशक्य आहे. प्लॅस्टिकचा खच असल्याने निर्माल्य असलेल्या खड्ड्यामध्ये गांडूळ सोडणे गांडूळांच्याच जीवावर बेतणारे आहे, तर जमिनीत प्लॅस्टिकची विल्हेवाट लागत नसल्याने सेंद्रिय खत निर्मिती होणेही शक्य नाही. महापालिकेने सकारात्मक दृष्टीने केलेल्या कार्याला योग्य नियोजनाची जोड नसल्याने त्याचा फटका खत निर्मिती प्रकल्पाला बसणार आहे. निर्माल्यापासून प्लॅस्टिक वेगळे करणे ही अवघड प्रक्रिया आहे. साहजिकच प्लॅस्टिकमिश्रित निर्माल्यापासून खतनिर्मिती होणार नाही. कृषी क्षेत्राशी संबंधित व्यक्तींचा समावेश प्रकल्प निर्मितीच्या कार्यात करणे गरजेचे होते. त्याकडे दुर्लक्ष झाल्याने यंदा निर्माल्यातून प्लॅस्टिक वेगळे कसे करायचे, हाच महत्त्वाचा प्रश्न आहे. - प्रा. रमेश कोळी, कृषी विस्तार शिक्षक, कृषी महाविद्यालय. प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा समावेश निर्माल्यामध्ये असल्याने खत निर्मितीत अडसर येणार आहे. पुढीलवर्षी कागदी पिशव्यांमधूनच निर्माल्याचा स्वीकार करणे अत्यावश्यक आहे. पुणे महापालिकेप्रमाणे निर्माल्यापासून प्लॅस्टिक वेगळे करणाऱ्या कंपनीला याचे कंत्राट दिल्यास खत निर्मिती प्रकल्प मार्गी लागेल. - प्रा. शशिकांत ऐनापुरे, डॉल्फिन नेचर ग्रुप, सांगली . निर्माल्यापासून खत निर्मितीसाठी ज्यावेळी निर्माल्य जमा करण्यात आले, त्यावेळी महापालिकेने कृषी महाविद्यालयांशी संपर्क साधणे गरजेचे होते. म्हणजे खत निर्मिती प्रकल्पास अडचण आली नसती. निदान पुढीलवर्षी तरी कृषिप्रेमींचे सहकार्य घेतले पाहिजे. गणेशभक्तांनी देखील प्लॅस्टिकच्या पिशवीतून निर्माल्य विसर्जित करू नये. - किशोर चंदुरे, जिल्हाध्यक्ष, कृषक समाज संघटना.
निर्माल्यापासून खत निर्मिती बारगळणार! परिसरात दुर्गंधी
By admin | Updated: September 10, 2014 23:55 IST