सांगली : सांगली-कर्नाळ रस्त्यावरील दत्तनगर परिसरात असणाऱ्या अंगणवाडी केंद्र क्र. २५ मधील शालेय पोषण आहारात अळ्या सापडल्याची घटना आज उघडकीस आली आहे. पोषण आहार पुरविणाऱ्या ठेकेदारावर त्वरित कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेअंतर्गत अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार पुरविण्यात येतो. परंतु अंगणवाडी केंद्र क्र. २५ मधील शालेय पोषण आहाराअंतर्गत देण्यात येणाऱ्या उपीटामध्ये अळ्या असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे आज दुपारी कार्यकर्त्यांनी शाळेत धाव घेतली आणि देण्यात येणाऱ्या पोषण आहाराची तपासणी केली. त्यावेळी पोषण आहारात अळ्या असल्याचे त्यांना दिसले. याबाबतची माहिती जिल्हा परिषदेच्या संबंधित अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरुन कळविण्यात आली. अधिकारी घटनास्थळी आल्यावर घटनेचा पंचनामा करण्यात आला. पोषण आहार पुरविण्याचा ठेका सध्या शहरातील एका बचत गटाकडे आहे. या ठेकेदाराची चौकशी करण्यात यावी, तसेच हा ठेका रद्द करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. (प्रतिनिधी)
सांगलीमध्ये पोषण आहारात अळ्या
By admin | Updated: September 11, 2014 23:05 IST