अविनाश कोळी -सांगली -जिल्ह्यातील घड्याळाचे खट्याळ काटे आता विरोधकांसह स्वकीयांनाही सतावत आहेत. दुसऱ्याची जिरविण्यासाठी नेत्यांकडून स्वकीयांचाही बळी दिला जात असल्याने, पक्षात राहून सासुरवास भोगण्याची वेळ उरलेल्या नेत्यांवर, कार्यकर्त्यांवर आली आहे. छुप्या पद्धतीच्या या खेळात गेल्या वर्षभरात राष्ट्रवादीचे सैन्यदल संपुष्टात आले. अनेकांनी इशाऱ्यावर पक्ष सोडले, तर काहींना बळीचा बकरा बनविण्यात आले. जिरवाजीरवीचे राजकारण पूर्वापार चालत आले असले तरी, या राजकारणात आता नव्या खेळ्या सुरू झाल्या आहेत. समोरासमोर युद्धाचा देखावा करून गनिमीकाव्याने विरोधकांना घायाळ करण्यापर्यंतच्या खेळ्या सर्वांना पचनी पडत होत्या. पण प्रत्येक गनिमीकाव्यासाठी एका स्वकीयाचा बळी देण्याचा हा प्रकार अनेकांच्या पचनी पडत नसल्याचे दिसत आहे. सांगली, पलूस-कडेगाव, मिरज आणि जत या ठिकाणी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना असाच काहीसा अनुभव यानिमित्ताने आला असावा. पक्षाची ताकद असूनही त्या ताकदीची रसद दुसरीकडेच वळविण्यात आली. गेल्या पंधरा वर्षांत घड्याळाने स्वत:च्या जिवावर टिकटिक सुरू ठेवली होती. आता या घड्याळाला कमळाचे वॉलपेपर चिकटले आहे. त्यामुळे घड्याळाची टिकटिक मंदावली आहे. तास आणि मिनीट काटाही आता वॉलपेपरच्या मागून फिरत असल्याने, घड्याळाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. माजी मंत्री जयंत पाटील यांनी सांगलीच्या राजकारणात आपला दबदबा कायम ठेवला आहे. त्यांच्या युक्त्यांनी अनेकांचे पट उद्ध्वस्त होत आहेत. वसंतदादा घराण्याशी त्यांचा संघर्ष आता उघड झाला आहे. विधानसभा निवडणुकीच्या मैदानात त्यांनी मदन पाटील यांना खुले आव्हान दिले. मदन पाटील यांचा पराभव हा काळ्या दगडावरील पांढरी रेघ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र त्यांचा पराभव कोण करणार, हे सांगितले नाही. त्यांचे हे वाक्य आणि आव्हान सत्यात उतरले, ते कमळाच्या रूपाने. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले. सांगलीतील उमेदवार सुरेश पाटील यांच्यामागील सैन्य अचानक गायब झाल्याने त्यांना एकट्याच्या जोरावर निवडणूक लढवावी लागली. अशी अवस्था झालेले सुरेश पाटील एकटे नव्हते. राष्ट्रवादीच्या अनेक उमेदवारांना हा अनुभव आला. सांगली आणि मिरजेचा विचार केला, तर महापालिकेच्या निवडणुकीतील मतांचा आणि विधानसभेच्या मतांचा ताळेबंद जुळत नाही. राज्याचे अर्थखाते जयंतरावांकडे बराच काळ होते. त्यामुळे त्यांनीच आता पक्षाच्या मतांचा ताळेबंद जुळवावा, अशी अपेक्षा भाबड्या उमेदवारांमधून, कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. चिन्हापेक्षा नेत्यांच्या इशाऱ्यात अधिक ताकद आहे. जयंतरावांनी महाआघाडीला सत्तेवर आणताना घड्याळ चिन्हाचा वापर केला नव्हता. त्यानंतर त्यांनी गत महापालिकेची निवडणूक घड्याळ चिन्हावर लढविली, तरीही त्यांनी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची मते आपल्याकडे वळविली. त्यामुळे त्यांनी पूर्ण ताकद लावली असती, तर राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या निश्चितपणे वाढली असती. राष्ट्रवादीचा ताळेबंदशहर महापालिकाटक्केवारी विधानसभा टक्केवारी सांगली९४,१११३0.५४, ७१८२.४३मिरज ५२,७६५३0.५१0,९९९५.९५
घड्याळाचे खट्याळ काटे!
By admin | Updated: October 21, 2014 23:38 IST