अर्जुन कर्पे --कवठेमहांकाळ --वेळ सायंकाळी चारची... कवठेमहांकाळ जुने बसस्थानक परिसरात वर्दळ असतानाच, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. पतंगराव कदम यांचे आगमन झाले आणि त्याठिकाणच्या मुस्लिम बांधवांना त्यांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या. उपस्थित सगळेच अवाक् झाले. ईदच्या निमित्ताने पतंगरावांनी गुरुवारी आर. आर. आबांची आठवण करून दिल्याची चर्चा शहरासह संपूर्ण तालुक्यात होती.आबांच्या निधनानंतर तालुक्यातील जनता खरं तरं जनमानसातल्या नेत्याच्या शोधात आहे. कामाचे राहू दे, पण आपुलकी, बांधिलकी जपणाऱ्या, माणसात मिसळणाऱ्या खंबीर नेत्याच्या शोधात जनता आहे. त्याचीच प्रचिती आज पतंगरावांच्या रूपाने आल्याची चर्चा रंगली आहे. आबांच्या कामाची पद्धत लोकांमध्ये मिसळून राहण्याची होती. लोकांना कोणत्याही अडचणीत आधार देऊन ते विचारपूस करीत असत. प्रसंग येईल तिथे सर्वसामान्य जनतेशी ते संवाद साधत होते. परंतु त्यांच्या निधनानंतर तालुक्यातील राजकीय क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. पतंगराव कदम रांजणी येथून कवठेमहांकाळकडे येत होते. बसस्थानकानजीक आल्यानंतर त्यांच्या नजरेतून मुस्लिम बांधव सुटले नाहीत. माजी जिल्हा परिषद सदस्य माणिकराव भोसले, उदय शिंदे यांच्या साक्षीने मुस्लिम युवकांना त्यांनी आपल्या रांगड्या, पण आपुलकीच्या भाषेत बोलावून घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी पतंगरावांभोवती मोठा घोळका जमा झाला आणि साहेब गर्दीत हरवून गेले. यावेळी मुस्लिम बांधवांनी पतंगरावांचा जल्लोषात सत्कार केला. यावेळी येथील शेतकऱ्यांचीही त्यांनी चौकशी केली व त्यांच्या गाडीने वेग घेतला.यानिमित्ताने आबांसारख्या नेत्याची आठवण जनसामान्यांना न झाली तरच नवल. असाच आबांचा दौरा ठरलेला असायचा. जनसामान्यांची विचारपूस आबाही तेवढ्याच आपुलकीने करायचे. याचीच आठवण आज पतंगराव कदम यांनी करून दिल्याची भावना व्यक्त होत होती.सोशल मीडियावर चर्चाकाही वेळातच कदम यांनी कवठेमहांकाळ येथील मुस्लिम बांधवांना भेट दिल्याची क्षणचित्रे सोशल मीडियावरून तालुक्यात पसरली आणि यानिमित्ताने कदम यांना धन्यवाद देत जनता आबांच्या आठवणीत रममाण झाली.
पतंगरावांनी जागविल्या आबांच्या आठवणी
By admin | Updated: July 8, 2016 00:57 IST