राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, वजनदार मंत्री जयंत पाटील यांचे राजकीय वारसदार म्हणून त्यांचे चिरंजीव प्रतीक यांचे ‘लाँचिंग’ होणार असल्याचे एव्हाना स्पष्ट झाले आहे. त्यांचे जिल्हाभरातील दौरे आणि सहकारी-स्थानिक स्वराज्य संस्थांच्या भेटीतून इरादे समोर येत आहेत. जिल्ह्याच्या राजकीय मैदानात त्यांचा सराव सुरू झाला आहे. लोकसभेच्या रिंगणातून ते पुढे येतील की साखर कारखाना, जिल्हा बँक, जिल्हा परिषदेतून राजकीय कारकीर्द सुरू करतील, हे मात्र अद्याप पुढे आलेले नाही.
राजारामबापूंच्या पश्चात उच्चशिक्षित जयंतरावांना राजकारणात येण्याचा आग्रह झाल्यानंतर वय कमी असल्याने विधानसभेची निवडणूक लढवता आली नव्हती. मात्र, राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्षपद देऊन त्यांचे ‘लाँचिंग’ झाले होते. त्यानंतर ते आमदार झाले.
प्रतीक यांनी २०१९मधील विधानसभेच्या निवडणुकीपासूनच राजकारणाचे धडे गिरवण्यास सुरुवात केली आहे. जयंतरावांकडे राज्याची जबाबदारी आल्यामुळे त्यांच्या माघारी मतदारसंघ सांभाळण्याची जबाबदारी प्रतीक यांच्याकडेच असते. तत्पूर्वी दोन वर्षे त्यांनी गणेश मंडळांना भेटी देण्याच्या माध्यमातून जनसंपर्काची मुहूर्तमेढ रोवली होती. दीड वर्षातील कोरोनाकाळात त्यांनी संपर्क वाढवताना जिल्हाभरात दौरे केले आहेत. राजारामबापूंच्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींवर भर दिला. तरुण नेत्यांशी चर्चा सुरू केल्या आहेत. त्यामागे जयंतरावांच्या गटाची पुनर्बांधणी आणि जिल्ह्यातील तरुण कार्यकर्त्यांची जुळवाजुळव हे दोन प्रमुख उद्देश दिसत आहेत.
सव्वीस वर्षीय प्रतीक पाटील यांनी व्यवस्थापन विषयातून एम.बी.ए. केल्यानंतर परदेशातील विद्यापीठात एम. एस. पदवी घेतली आहे. काही काळ खासगी कंपन्यांमध्ये उमेदवारीही केली आहे. त्यानंतर मात्र जयंतरावांचा राजकीय वारसा चालवण्याची तयारी सुरू केली. गेल्या चार महिन्यांत ते अधिक सक्रिय झाल्याचे दिसतात. विधानसभेच्या इस्लामपूर मतदारसंघातील गावांमध्ये कोरोनाकाळात मदत पोहोचवण्यासह थेट आरोग्य केंद्रांमध्ये जाऊन आढावा घेण्यापर्यंतची जबाबदारी पेलतानाच, सांगली लोकसभा मतदारसंघावरही लक्ष ठेवून दौरे केले आहेत. सांगली लोकसभा मतदारसंघात दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसची पीछेहाट झाल्यामुळे या जागेवर राष्ट्रवादी दावा करेल, असे संकेत आहेत. राष्ट्रवादीत सध्यातरी जिल्हाभर चालणारा तगडा इच्छुक नसल्याने प्रतीक यांना सहज चाल मिळू शकते. सहकारी संस्थांमधून त्यांचे ‘लाँचिंग’ करायचे ठरले तर चार-चार शाखा असणाऱ्या राजारामबापू कारखान्याचा पर्याय पुढे येऊ शकतो किंवा काही महिन्यांत होणाऱ्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ते जयंत पाटील गटातून उतरू शकतील. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून कारकीर्द सुरू करायची ठरल्यास जिल्हा परिषद, पंचायत समितीचा हमरस्ता आहेच!
राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे वारसा
अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ या राज्यातील राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांच्या पाठोपाठ जयंतरावही मुलाचे ‘लाँचिंग’ धडाक्यात करणार असल्याचे संकेत आहेत. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे आमदार अरुण लाड यांचे चिरंजीव शरद लाड आणि आ. मानसिंगराव नाईक यांचे चिरंजीव विराज यांचा राजकारण प्रवेश झाला आहे, तर दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचा मुलगा रोहित राजकीय क्षेत्राच्या उंबरठ्यावर आहे.
घराणेशाहीच्या आरोपाचा गुळगुळीत मुद्दा
राजारामबापूंच्या घराण्यातील तिसरी पिढी प्रतीक यांच्या रूपाने राजकीय क्षेत्रात येत आहे. अर्थात जयंतरावांचे विरोधक घराणेशाहीच्या आरोपाचा मुद्दा आणखी घासून गुळगुळीत करतीलच. कर्तृत्व, दूरदृष्टी, अभ्यास, संघटन कौशल्य आणि अंगभूत नेतृत्वाची देणगी या बळावर अनेकांनी या मुद्द्याचा कचरा केला आहे... आणि घराणेशाही जोपासत नसलेला कोणता पक्ष सध्या राजकारणात आहे?