सुरेश भाेसले, डॉ. इंद्रजित मोहिते
अशोक पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : निवडणूक, कोरोनाचा संसर्ग या पार्श्वभूमीवर यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची सभा ऑनलाईन होत आहे. याला रयत पॅनेलचे प्रमुख डॉ. इंद्रजित मोहिते यांनी आक्षेप घेतला आहे. याउलट गेल्या एक वर्षापासून कोरोनाच्या भीतीने स्वत: मात्र सोशल मीडियावरच प्रचार करत आहेत.
सातारा जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहता, ‘कृष्णा’ची सर्वसाधारण सभा ऑनलाईन घेण्याची तयारी विद्यमान सहकार पॅनेलने सुरू केली आहे. हा निर्णय अंतिम होण्याअगोदरच रयत पॅनेलचे प्रमुख डॉ. इंद्रजित मोहिते यांनी आक्षेप घेतला आहे. कारण सर्वसामान्य सभासदांकडे संचारमाध्यमे, स्मार्ट मोबाईल या सुविधा नाहीत. छापील अहवाल सभासदांच्या हातात आला नाही. त्यामुळे सभासदांच्या समस्या मांडणार कशा, असा मुद्दा मोहिते यांनी उपस्थित केला आहे. सभासदांना प्रश्न मांडण्याची संधी मिळणार नाही.
या हंगामात उसाची तोड वेळेत होत नाही. ऊस वेळेवर गाळला जात नाही. तोडणी, वाहतुकीच्या खर्चाचा बोजा सभासदांवर पडत आहे. इरिगेशनचे तोटे वाढले आहेत. बैठी पाणीपट्टी चालू आहे. इतर कारखान्यांपेक्षा आमचा दर कमी झाला आहे. तोडणी वाहतुकीची केस अद्यापी न्यायप्रवीष्ट आहे. त्याचा बोजाही सभासदांवर पडणार आहे. अल्प पगारात काम करणाऱ्या कामगारांवर अन्याय होत आहे. त्यांचे प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत आदी विविध मुद्दे सभेपुुढे मांडता येणार नाहीत. हा कळीचा मुद्दा डॉ. इंद्रजित मोहिते यांनी सोशल मीडियातून प्रचारात आणला आहे.
चौकट
गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. त्यामुळे डॉ. इंद्रजित मोहिते यांनी सभासदांना थेट संपर्क न साधता सोशल मीडियावरून प्रचाराची रणधुमाळी सुरू केली आहे. मात्र आता सहकार पॅनेल कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसाधारण सभा ऑनलाईन घेण्याच्या तयारीत असतानाच डॉ. मोहिते यांचा आक्षेप ऊस उत्पादक सभासदांच्या पचनी पडणार का, हा प्रश्न आहे.