कुपवाड : कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील केमिकल उद्योगांमधून बाहेर पडणारे केमिकलमिश्रित सांडपाणी सध्या उद्योजकांकडून उघड्यावर सोडण्यात येत आहे़ त्यामुळे औद्योगिक क्षेत्रालगतचे शेतीक्षेत्र धोक्यात आले आहे़ त्यातच गेली अनेक वर्षे रखडलेल्या एमआयडीसीतील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाकडेही औद्योगिक विकास महामंडळाचे दुर्लक्ष होत असून, हा प्रकल्प त्वरित पूर्ण करण्याची मागणी होत आहे़ औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यक्षेत्रात असलेल्या कुपवाड औद्योगिक वसाहतीमध्ये पाचशेहून अधिक उद्योग कार्यरत आहेत़ जिल्ह्यातील या सर्वात मोठ्या असलेल्या एमआयडीसीत इंजिनिअरिंग, आॅईल, प्लास्टिक, कोल्ड स्टोअरेजबरोबरच अनेक केमिकलमिश्रित उद्योग या एमआयडीसीत कार्यरत आहेत़ या केमिकल उद्योगामधूनच औद्योगिक क्षेत्रालगतच्या शेतीक्षेत्रामध्ये उघड्यावर सांडपाणी सोडले जात आहे़ त्यामुळे औद्योगिक क्षेत्रालगतचे शेतीक्षेत्र धोक्यात आले आहे़ शेतीक्षेत्र कानडवाडी, सावळी, बामणोली या गावामध्ये आहे. औद्योगिक क्षेत्रालगतच्या शेतीमध्ये कोणतेही पीक येत नाही़ पीक आले तरी त्या पिकाला या केमिकलमिश्रित सांडपाण्याचा मोठा धोका सहन करावा लागत आहे़ याबरोबरच औद्योगिक क्षेत्रालगतच्या विहिरींचे पाणीही खराब झाले आहे़ हे पाणी शेतीबरोबरच पिण्यासही खराब झाले आहे़ याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाला कळविले़ तरीही त्यांच्याकडून या केमिकलमिश्रित सांडपाणी सोडणाऱ्या कारखान्यांवर कारवाई केली जात नाही़ या केमिकलमिश्रित सांडपाण्याची समस्या निकालात काढण्यासाठी औद्योगिक विकास महामंडळाच्या मार्गदर्शनाखाली उद्योजकांनी कृष्णा व्हॅली इन्व्हायरोटेक प्रा़ लिमिटेड ही कंपनी स्थापन केली़ त्यांनी कुपवाड एमआयडीसीमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे निम्म्याहून अधिक कामही पूर्ण केले़ परंतु, न्यायालयीन प्रक्रियेचे नाव पुढे करून हा प्रकल्प दुर्लक्षितच राहिला आहे़ या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे तत्कालीन उद्योगमंत्री डॉ़ पतंगराव कदम यांच्याहस्ते उद्घाटन झाले होते़ त्या उद्घाटनापासून जिल्ह्यातील नेत्यांनीही या प्रकल्पाकडे लक्ष दिले नाही़ याबरोबरच औद्योगिक विकास महामंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह सचिवांकडेही तक्रारी होऊन त्यांनीही या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाकडे दुर्लक्ष केले आहे़ कोल्हापूरमध्ये या प्रकल्पाप्रमाणेच प्रकल्प पूर्ण होऊन त्याचे कामही उत्कृष्टपणे सुरू आहे़ मात्र, जिल्ह्यात विकासाचे व्हिजन नसल्यामुळे जाणूनबुजून दुर्लक्ष होत आहे़ त्यामुळे उद्योजकांमध्ये नाराजी पसरली असून, औद्योगिक विकास महामंडळाने या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी होऊ लागली आहे़ तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळानेही केमिकल मिश्रित सांडपाणी सोडणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी शहर परिसरातील नागरिकांतून व्यक्त होऊ लागली आहे़ (वार्ताहर)
औद्योगिक क्षेत्रालगतचे शेतीक्षेत्र आले धोक्यात
By admin | Updated: October 26, 2014 00:02 IST