सांगली : आदर्श शिक्षक पुरस्कार निवडीचे भिजत घोंगडे गेल्या आठ दिवसांपासून चर्चेत आहे. शिक्षक दिन दोन दिवसांवर आल्यानंतरही पुरस्कार निवड समितीची बैठकच झाली नसल्यामुळे शिक्षक संघटनातून नाराजीचा सूर आहे. जिल्ह्यातून २४ प्रस्ताव आले असून, बाराजणांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. पुरस्कार निवडीसाठी अखेर दि. ४ रोजी निवड समितीची बैठक होत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.आदर्श काम करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार सुरू केले आहेत. पुरस्कार मिळणाऱ्या शिक्षकाला रोख रक्कम आणि जादा वेतन वाढ देण्यात येते. दरवर्षी पुरस्कार निवडीवेळी शिक्षकांची जिल्हा परिषदेत गर्दी वाढत असते. याप्रमाणे यंदाही शिक्षकांची जिल्हा परिषदेत वर्दळ वाढली आहे. पण, जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी पुरस्कार जाहीर निवडीलाच विलंब केल्यामुळे शिक्षकांतून नाराजीचा सूर आहे. चार दिवसांपूर्वी तीन तालुक्यातून आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रस्तावच आले नव्हते. यामुळे पुरस्कार निवडीची बैठकच झाली नव्हती. दोन दिवसात जिल्ह्यातून २४ प्रस्ताव आले असून, बुधवारी संध्याकाळी पुरस्कारावर पदाधिकारी चर्चा करणार आहेत. गुरुवार, दि. ४ रोजी सकाळी अधिकृत निवड समितीची बैठक होऊन आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर होणार आहेत. शिराळा, वाळवा, मिरज, तासगाव, पलूस, खानापूर तालुक्यातून प्रत्येकी तीन, कवठेमहांकाळ, जत तालुक्यातून दोन आणि कडेगाव, आटपाडी तालुक्यातून केवळ एकच प्रस्ताव आले आहेत. जादा प्रस्ताव आलेल्या तालुक्यातील आदर्श शिक्षक निवडताना निवड समितीची गोची होणार आहे. गेल्यावर्षापासून कन्नड शिक्षकांनाही पुरस्कार देण्यात येणार आहे. जत तालुक्यातून मराठी आणि कन्नड भाषिक असे दोनच प्रस्ताव आले आहेत, अशी माहिती उपशिक्षणाधिकारी डी. सी. लोंढे यांनी दिली. (प्रतिनिधी)
गुरुजींच्या आदर्श पुरस्काराचे भिजत घोंगडे
By admin | Updated: September 3, 2014 23:59 IST