सांगली : बँक आॅफ इंडियाच्या सांगलीतील पटेल चौक शाखेतून उमेश शंकरराव बोंगाळे (रा. आनंदबन, कुपवाड रस्ता, सांगली) या खातेदाराचे त्यांच्या लॉकरमधून पावणेअकरा तोळ्याचे सोन्याचे कडे लंपास झाले आहे. त्याची किंमत सव्वातीन लाख रुपये आहे. २६ एप्रिलला दुपारी चार वाजता ही घटना घडली आहे. याप्रकरणी सोमवारी रात्री शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.उमेश बोंगाळे यांच्या पत्नी याच बँकेत नोकरीस होत्या. काही महिन्यांपूर्वी त्या सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्यांचे याच बँकेत खाते तसेच लॉकरही आहे. लॉकरचा क्रमांक १८२ आहे. २६ एप्रिलला त्यांच्या घरी कार्यक्रम होता. यासाठी बोंगाळे दाम्पत्याने लॉकरमधील चांदीची भांडी नेली होती. कार्यक्रम झाल्यानंतर याचदिवशी दुपारी चार वाजता ते लॉकरमध्ये भांडी ठेवण्यासाठी आले होते. बोंगाळे यांच्या पत्नी लॉकर रूममध्ये गेल्या होत्या. लॉकर उघडून त्या भांडी ठेवत होत्या. पण भांडी बसत नव्हती. त्यामुळे त्यांनी आत पावणेअकरा तोळ्याचे सोन्याचे कडे असलेला बॉॅक्स बाहेर काढला. यादरम्यान वीज पुरवठा बंद झाला होता. बोंगाळे यांनी मोबाईलच्या प्रकाशात भांडी लॉकरमध्ये ठेवली. घाईगडबडीत त्या सोन्याच्या कड्याचा बॉक्स ठेवण्यास विसरुन गेल्या. त्यानंतर त्या घरी गेल्या. दुसऱ्यादिवशी बोंगाळे दाम्पत्याला सोन्याचे कडे लॉकरमध्ये ठेवायला विसरलो असल्याचे लक्षात आले. ते तातडीने बँकेत आले. लॉकर रूममध्ये गेले. पण सोन्याचे कडे नव्हते. कदाचित लॉकरमध्ये ठेवले असेल, असा अंदाज करुन त्यांनी ते उघडले. मात्र आत चांदीच्या भांड्यांशिवाय काहीच नव्हते. कड्याची चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी बँक प्रशासनाकडे तक्रार केली. प्रशासनाने गेले दहा ते बारा दिवस चौकशी केली. तथापि काहीच सुगावा न लागल्याने त्यांनी सोमवारी रात्री शहर पोलिसांत फिर्याद दाखल केली. (प्रतिनिधी)सीसीटीव्ही नाही : ग्राहकांची चौकशी--लॉकर रूममधूनच सोन्याच्या कड्याची चोरी झाली आहे. याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेराही नाही. त्यामुळे याचा छडा लावणे पोलिसांना आव्हान बनले आहे. २६ एप्रिलनंतर लॉकर रूममध्ये कोण-कोण ग्राहक येऊन गेले, हे तपासून त्यांच्याकडे चौकशी केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यासाठी बँक प्रशासनाकडे २६ व २७ एप्रिल रोजी लॉकरमध्ये किती ग्राहक, कोणत्या कामासाठी येऊन गेले, याची माहिती घेण्यास सांगितले आहे. ही माहिती आल्यानंतर संबंधित ग्राहकांकडे चौकशी केली जाणार आहे. चौकशीतील माहितीच्या आधारे पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
बँकेमधून सोन्याचे कडे लंपास
By admin | Updated: May 11, 2016 00:54 IST