तासगाव : तासगाव तालुक्यातील खुजगाव, सावर्डे परिसरात दोन गव्यांचे दर्शन झाल्याने खळबळ उडाली. सकाळी ६ वाजता हे गवे खुजगाव परिसरातील शेतकऱ्यांना दिसले. सकाळपासून या परिसरात शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. वन विभागाकडून त्यांच्या शोधासाठी प्रयत्न करण्यात आले. परंतु, सायंकाळपर्यंत गव्यांचा पत्ता लागला नाही. हे गवे चांदोली परिसरातून आले असल्याचा प्राथमिक अंदाज वन खात्याकडून व्यक्त करण्यात आला.आज सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान खुजगावातील शेतकऱ्यांना या गव्यांचे दर्शन झाले. यानंतर लगेच परिसरातील शेतकरी गोळा झाले. तोपर्यंत गवे वाघापूरच्या हद्दीत शिरले. तिथेही गव्यांची माहिती मिळाल्याने वाघापुरातील शेतकरी गव्यांच्या मागे होते. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास सावर्डे परिसरात हे गवे असल्याचे समजले.या परिसरातल्या गावांमध्ये गवे आले असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाल्याने गावांच्या शिवारात ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. अनेकांनी दोन गवे बघितले असल्याने ग्रामस्थांची उत्सुकता वाढलेली होती. उभ्या पिकातून गवे व त्यामागून ग्रामस्थ, असा धुमाकूळ दुपारपर्यंत सुरूच होता. दुपारी १२ नंतर मात्र गव्यांचा पत्ता लागलाच नाही. दरम्यान, या घटनेची माहिती वन विभागाला दिली. वनक्षेत्रपाल डी. आर. कोंडुस्कर, वनपाल पी. डी. सुतार, सांगलीतील फिरत्या पथकाचे वनक्षेत्रपाल कट्टे व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनीही गव्यांचा शोध घेतला. परंतु दुपारनंतर ते दिसलेच नाहीत. या घटनेनंतर वन विभागाने परिसरातील ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. उद्या गव्यांना गुंगीचे औषध देण्यात येणार असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत लोदे, लोदे तलाव भागात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची गस्त सुरू होती. (वार्ताहर)
खुजगाव, सावर्डे परिसरात गव्यांचे दर्शन
By admin | Updated: February 12, 2015 00:31 IST