सांगली : कवलापूर (ता. मिरज) येथे मायाक्का देवीच्या यात्रेनिमित्त काल, सोमवारी रात्री आयोजित करण्यात आलेल्या ‘आॅर्केस्ट्रा’कार्यक्रमात तरुणांच्या टोळक्याने धिंगाणा घातल्याने यातून दोन गटांत मारामारी झाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. कार्यक्रम सुरू असतानाच प्रेक्षकांच्या गर्दीत मांजर सोडून साप आल्याची अफवा पसरविल्याने सर्वांची पळापळ झाली. टोळक्याचा हा गोंधळ सुरू राहिल्याने शेवटी रात्री दीड वाजता यात्रा कमिटीला कार्यक्रम रद्द करावा लागला. रविवारपासून मायाक्का देवीच्या यात्रेला सुरुवात झाली आहे. पाच दिवस भरविण्यात आलेल्या यात्रेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. कवलापुरातील नियोजित विमानतळाला लागून मायाक्का देवीचे मंदिर आहे. यामुळे कार्यक्रमही तिथेच भरविण्यात आले आहेत. सोमवारी रात्री दहा वाजता आॅर्केस्ट्रा होता. महिला, पुरुष व तरुणांनी कार्यक्रम पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. व्यासपीठाला लागून तरुणांचे एक टोळके बसले होते. या टोळक्याने बारापासून धिंगाणा घालण्यास सुरुवात केली. आॅर्केस्ट्रामधील कलाकार चित्रपटातील गाण्यावर नृत्य सादर करीत होते. त्यावेळी हे सर्व एकाचवेळी उठून ओरडत आणि उडी मारुन खाली बसत होते. त्यांचा हा प्रयोग सातत्याने सुरू राहिल्याने पाठीमागे बसलेल्या प्रेक्षकांना कार्यक्रम दिसत नव्हता. यामुळे प्रेक्षकांनीही गोंधळ घालण्यास सुरुवात केल्याने दहा मिनिटे कार्यक्रम बंद ठेवण्यात आला होता. यात्रा कमिटीच्या पदधिकाऱ्यांनी व्यासपीठावरून सर्वांना शांत राहून सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्यानंतर कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. मात्र पुन्हा टोळक्याचा धिंगाणा सुरूच राहिला. ते दोन-तीन मिनिटातून एकदा ओरडत व उडी मारुन खाली बसायचे. बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी तिथे धाव घेतली. धिंगाणा घालणाऱ्या तरुणांना ताब्यात द्यावे, अशी मागणी पोलिसांनी यात्रा कमिटीच्या पदाधिकाऱ्यांकडे केली. परंतु पदाधिकाऱ्यांनी गावात वादंग नको, राहू दे, अशी पोलिसांना विनंती केली. कार्यक्रम सुरू असतानाच प्रेक्षकांच्या गर्दीत मांजर सोडून साप आल्याची अफवा पसरविल्याने सर्वांची पळापळ झाली. यातून टोळक्यासोबत मारामारीही झाली. (प्रतिनिधी)
कवलापुरात ‘आॅर्केस्ट्रा’वेळी मारामारी
By admin | Updated: February 18, 2015 01:15 IST