अमर पाटील - शिरशी --शेतकरी व शेती हे अतूट नाते आहे. सुगीच्या काळात सुमारे दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीमध्ये शेतातील ही कामे सलगपणे सुरु असतात. शेतातील मध्यवर्ती संपर्क कार्यालय म्हणून जोडणारे व सर्व मदतीला उभे असणारे ‘खळे’ हे आता आधुनिक काळात इतिहासजमा होत आहे. त्याची जागा आता प्लॅस्टिकच्या कागदाने घेतली आहे.सपाट माळरानावरील तण खुरपून त्यावर शेणाचा सडा टाकून सुमारे दोन गुंठे जागेवर सपाट गोलाकार जमीन तयार केली जाते. यामध्ये मधोमध केंद्रस्थानी एक लाकडी खांब रोवला जातो. त्याला ‘तिवडा’ असे म्हणतात. खळ्यामध्ये भाताची मळणी केली जाते. शेतातील भातपीक अंथरुण त्यावर गाई, म्हैशी तिवड्याला जुंपून गोलाकार फिरवल्या जात. काही शेतकरी बैलजोडी दगडी रोलरला जुंपून मळणी करत होते. अलीकडे ट्रॅक्टरच्या साहाय्याने मळणी केली जात आहे.मागील १५ वर्षांपूर्वी सुगीचे हे दिवस शेतकऱ्यांच्या जीवनातील मंतरलेले दिवस असायचे. याच खळ्याशेजारी असणाऱ्या खोपीतूनच सगळा कारभार चालायचा. बांबू, गवताच्या साहाय्याने उभारलेली ही खोप ऊन, वारा, पाऊस, थंडीपासून त्यांचे संरक्षण करायची. दरवाजा नाही, परंतु चोरीही नाही. लाखमोलाचे धान्य उघड्यावरच पडलेले असायचे. मोकळ्या खळ्यावर धान्य वाळवणे, वारे देऊन स्वच्छ करणे आदी कामेही चालायची.कर्ता माणूस सुमारे दोन महिने येथे मुक्कामालाच असायचा. सकाळी, सायंकाळी गावातून जेवण पोहोच व्हायचे. झुंजूमुंजू होताच सुरु झालेला दिवस मध्यरात्रीपर्यंत काढलेल्या भाताच्या मळणीनेच संपायचा. दिवाळी सणाचे फार अप्रूप नसायचे. शेतातील कामे महत्त्वाची वाटायची. घरच्या सुगरणीने केलेला एखाद्दुसरा गोड पदार्थ व दिवाळीच्या सणादिवशीचे पाणी (अभ्यंगस्नान) इतकेच ते महत्त्व. रिकाम्या झालेल्या शेतात पुन्हा रब्बी पिकांची पेरणी. या दोन महिन्यात मालकाबरोबरच बैलांचीही खळ्याला सोबत असायची. रिकाम्या वेळेत गवतात चरणे व आराम. मालक कधी जुंपेल तेव्हा कामास तयार. हे मंतरलेले दिवस ज्या जुन्या पिढीतील शेतकऱ्यांनी अनुभवले, ते खरंच भाग्यवान. अन्यथा आतासारख्या आधुनिक काळात ताण—तणाव, कमी झालेली व आतबट्ट्यात आलेली शेती, लाडक्या बैलजोडीला गमावलेली शेती, ही राज्यकर्त्यांच्या अनास्थेमुळे अडचणीत सापडली आहे. त्यामुळे आता शेती करण्यास तरुण तयार नाहीत.बळिराजापुढील अनेक प्रश्न अनुत्तरीत शेतीला सरकारचे प्रोत्साहन नाही. वेळेवर वीज नाही. हमीभाव नाही. कारभार हाकणारं खोपीसारखं संपर्क कार्यालय कधीच मोडून गेलंय. जुन्या शेताला पाणी पाजायच्या मोटी भंगारात गेल्यात. बैलजोडी परवडत नाही. सुगीपुरता एखादा बैल, सुगी संपताच कसायाच्या हाती. हाता—तोंडाची मिळवणी करण्यासाठी पिकेल ते धान्य मिळेल त्या किमतीला व्यापाऱ्याला विकणे अनिवार्य झालेय. गोदामातील धान्यावर व्यापाऱ्याला कर्ज मिळतंय. वर्षभर जगायचं कसं? शेतीत गुंतवायला पैसा नाही. दूध धंद्याचीच तेवढी साथ. सरकार नावाची यंत्रणा याचा काही विचार करेल काय? खरोखर दु:ख भोगणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारची धोरणं ठरतील काय? असे अनेक अनुत्तरीत प्रश्न गेली कित्येक वर्षे बळिराजासमोर उभे आहेत.
शेतामधील खळे होत आहे आता इतिहासजमा...
By admin | Updated: November 16, 2014 23:35 IST