मिरज : सांगली जिल्हा परिषद, सर्व पंचायत समित्या, सहकारी संस्था, सोसायट्या शिवसेना स्वबळावर लढविणार असल्याची घोषणा शिवसेनेचे सांगली जिल्हा संपर्कप्रमुख नितीन बानुगडे-पाटील यांनी मिरजेत मंगळवारी शिवसेनेच्या मेळाव्यात केली. शिवसेनेची पक्षबांधणी जोमाने करणार असून, गटबाजी करणाऱ्यांना हाकलून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मिरजेत शिवसैनिकांच्या मेळाव्यास जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बानुगडे-पाटील म्हणाले की, मी संपर्कप्रमुख म्हणून काम करताना गेस्ट हाऊसमध्ये बसून चर्चा करणार नाही, तर गावा-गावात जाऊन शिवसेनेच्या बैठका घेऊन शाखा उघडणार असून, शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडविण्यासाठी प्रयत्नशील रहावे. जिल्ह्यातील सर्व निवडणुका शिवसेना स्वबळावर लढविणार असून, सत्तेत असल्याने लोकांचे प्रश्न सोडविण्याची क्षमता शिवसेनेकडे आहे. याचा वापर करून कार्यकर्त्यांनी जनतेचे प्रश्न सोडवून त्यांच्या अपेक्षा पूर्ण करून विश्वास निर्माण करावा.येणारा काळ शिवसेनेचा आहे. सांगली जिल्हा पक्षाचा बालेकिल्ला व्हावा, यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्रित यावे, शिस्तबध्द वागावे, अन्यथा गटबाजी करणाऱ्यांचे राजीनामे न मागता त्यांची हकालपट्टी करण्यात येईल, असा इशारा बानुगडे-पाटील यांनी दिला. मेळाव्यात मनसेसह विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांचे शिवबंधन बांधून स्वागत करण्यात आले. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बानुगडे-पाटील यांचा सत्कार केला. मेळाव्यास रावसाहेब घेवारे, रावसाहेब खोचगे, बजरंग पाटील, पृथ्वीराज पवार, शिवसेना जिल्हाध्यक्ष विकास सूर्यवंशी, सुवर्णा मोहिते, तानाजी सातपुते, रुक्मिणी अंबीगेर, विशाल रजपूत, दीपक वाघमारे, चंद्रकांत मैगुरे, सुनीता मोरे, गजानन मोरे उपस्थित होते. आ. अनिल बाबर व त्यांचे समर्थक मेळाव्यास अनुपस्थित होते. (वार्ताहर)
गटबाजी करणाऱ्यांची सेनेतून हकालपट्टी
By admin | Updated: December 30, 2014 23:29 IST