कोकरुड : शिराळा पश्चिम भागातील अनेक वाडी-वस्तींवर इंटरनेट सुविधा सक्षमपणे सुरू नसते. यामुळे ई-पीक नोंदणीस शेतकरी मुकणार असून, याला पर्यायी सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे.
राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी ई-पीक पाहणी हे नवीन मोबाईल ॲप आणले आहे. १५ ऑगस्टपासून ही योजना सुरू झाली आहे. त्याची मुदत संपत आली आहे. मात्र शिराळा पश्चिम भागातील १५ ते २० वाडी-वस्तींवर अद्यापही मोबाईल सेवा पोहोचलेली नाही. खासगी कंपनीचे टॉवर फक्त मोठ्या गावात असल्याने तेथे इंटरनेट सेवा मिळत आहे. मेणी परिसरातील दहा वाडी-वस्त्या, पणुंब्रे, काळुंद्रे, आरळा, गुढे-पाचगणी परिसरात मोबाईल टॉवर नाहीत. भारत दूरसंचार विभागाचे टॉवर आहेत; मात्र चोवीस तासांतील काही तासच ही सेवा सुरू असल्याने शासकीय कामात अडथळा येतो.
कोट
गुढे पठारावरील अनेक शेतकऱ्यांना आपल्या शेतीचे गट नंबर, सर्व्हे नंबर पाठ नाहीत. काही शेतकऱ्यांच्या जमिनी स्वतःच्या नावावर नसून, अजूनही वडील, आजोबा, पणजोबा यांच्या नावे आहेत. त्यामुळे ई-पीक पाहणी अडचणीची बनली आहे.
- सखाराम दुर्गे, सरपंच, गुढे.
कोट
मेणी परिसरात दहा वाडी-वस्त्या डोंगर, दरीला लागून आहेत. त्यातच खासगी कंपनीचा एकही मोबाईल टॉवर नाही. भारत दूरसंचारचा एक टॉवर आहे. त्याची ही रेंज नसते. येथील नागरिकांना फोन करण्यास मेणी फाटा येथे जावे लागते. त्यामुळे ई-पीक पाहणी अवघडच आहे.
- बाबूराव पाटील, शेतकरी, रांजणवाडी.