इस्लामपूर : भारतीय राजकारणातील शेतीचे महत्त्व आणि शेतीच्या अर्थकारणातील राजकारण हे विषय गुंतागुंतीचे आहेत. शेतीच्या अर्थकारणाचे राजकारण करण्याची प्रवृत्ती बळावल्याने शेतकरी मूलभूत मदतीपासून वंचित राहून शेती अडचणीत आली आहे. प्रत्येक शेतमालासाठी किमान आणि कमाल किंमत ठरवल्यास शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न सुटतील, असे मत माजी ग्रामविकास मंत्री आमदार जयंत पाटील यांनी शुक्रवारी व्यक्त केले.ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. डॉ. जे. एफ. पाटील यांनी लिहिलेल्या ‘भारतीय शेतीचे अर्थकारण’ या पुस्तकाचे प्रकाशन आ. पाटील यांच्याहस्ते येथे झाले. शिवाजी विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्र विभागाचे अधिष्ठाता प्रा. डॉ. जे. एस. पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी कासेगाव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शामराव पाटील, सचिव प्राचार्य आर. डी. सावंत, टी. ए. चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती.आ. पाटील म्हणाले की, डॉ. जे. एफ. पाटील यांचे सर्वांगांनी परिपूर्ण पुस्तक शेतीच्या अर्थकारणावर भाष्य करणाऱ्यांसाठी अभ्यासावे असे आहे. यामध्ये शेतीच्या अर्थकारणाची उत्तम मांडणी करण्यात आली आहे. आपली शेती जगण्यासाठी परिपूर्ण नाही, अशा निष्कर्षापर्यंत समाज आला आहे. त्यामुळेच आज गुजरातमध्ये प्रगत शेती करणारा पाटीदार-पटेल समाज आरक्षणासाठी आंदोलन करत आहे. महाराष्ट्रातही मराठा समाज याच मन:स्थितीत आहे. याची मूळ कारणे शेतीमध्ये आहेत. ते म्हणाले की, किफायतशीर शेती करता यावी म्हणून शेतकऱ्याने माहितीशास्त्राची मदत घ्यावी. त्याला संशोधनाचा मोठा पाठिंबा मिळायला हवा. त्याच्या पिकाची माहिती बाजारपेठेत पोहोचली पाहिजे. ग्राहकांना महत्त्व देतानाच त्याच्या मालाला योग्य दर मिळाला पाहिजे. प्रा. डॉ. जे. एफ. पाटील म्हणाले की, भारतीय शेती आणि शेतकऱ्यांचे दुखणे कायमचे मिटवायचे असेल तर वैद्यनाथन समितीच्या शिफारशींची अंमबजावणी व्हायला हवी. शेतीपूरक मूल्यवर्धित प्रकल्प उभारून रोजगार संधी निर्माण केल्या पाहिजेत.डॉ. जे. एस. पाटील म्हणाले की, शेअर बाजार, रुपयाची घसरण, परकीय देशातील घडामोडी याच्या चर्चा करतानाच शेतीचीही चर्चा झाली पाहिजे. शेती किफायतशीर करून शेतकऱ्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम केल्यास आत्महत्या होणार नाहीत. यावेळी डॉ. एम. एन. शिंदे, डॉ. ए. एस. महाडिक, प्राचार्य डॉ. पी. बी. कुलकर्णी यांचीही भाषणे झाली.प्राचार्य आर. डी. सावंत यांनी प्रास्ताविक केले. प्रा. दशरथ पाटील, सौ. रेखा कोळेकर यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य डॉ. राजेंद्र कुरळपकर यांनी आभार मानले. यावेळी प्रकाशक अमेय जोशी, विद्यापीठाचे प्रबंधक बी. पी. साबळे, प्राचार्य बी. एस. काळे उपस्थित होते. (वार्ताहर)
अर्थकारणाचे राजकारण केल्याने शेती अडचणीत
By admin | Updated: August 29, 2015 00:21 IST