संतोष भिसे/सांगली : कोरोना आणि लॉकडाऊनकाळातही जिल्ह्याचा जन्मदर स्थिर राहिला आहे. ऐन कोरोनाकाळात गेल्या वर्षभरात ४४ हजार १८५ बालकांचा जन्म झाला. कोरोनापूर्वीदेखील सरासरी इतकाच जन्मदर होता.
लॉकडाऊनमध्ये कुटुंबांचे आर्थिक स्रोत थांबल्याने शहरी भागात दांपत्यांनी अपत्यजन्म लांबणीवर टाकल्याचे आरोग्य विभागाचे निरीक्षण आहे. अनेक जोडप्यांनी गर्भधारणाही टाळली होती. खासगी प्रसूतितज्ज्ञांनीदेखील अशीच निरीक्षणे नोंदविली आहेत. मात्र, जन्मदराची आकडेवारी पाहिली असता सरासरी कायम राहिल्याचे आढळले आहे. कोरोनाचे संकट येण्यापूर्वी म्हणजे २०१८ या वर्षामध्ये ४३ हजार ४२० बालकांचा जन्म झाला होता. २०१९ च्या शेवटच्या टप्प्यात कोरोनाची साथ पसरू लागली, त्यावर्षीदेखील ४५ हजार ९१४ बालके जन्मली होती. २०२० हे पूर्ण वर्ष कोरोनामय होते. या वर्षातही जन्मदराचा वेग स्थिर राहीला. या वर्षात ४४ हजार १८५ बालकांनी या जगात प्रवेश केला.
कोरोनाग्रस्त मातांनीही ठणठणीत व सुदृढ बालकांना जन्म दिला. आरोग्य विभागाकडील नोंदीनुसार महापालिका क्षेत्रात जन्मदर सर्वाधिक होता. शिवाय इस्लामपूर, विटा, तासगाव, जत आदी निमशहरी भागातही जन्मदर कायम राहिला. लॉकडाऊनकाळात अपत्यजन्माचे प्रमाण जास्त राहील असा तज्ज्ञांचा अंदाज होता, तो फोल ठरला. सजग जोडप्यांनी लॉकडाऊन काळात एकाच अपत्याला पसंती दिल्याने जन्मदर फारसा वाढला नसल्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली. कोरोनाकाळात कोरोनाग्रस्त मातांनीही ठणठणीत व सुदृढ बालकांना जन्म दिला.
बॉक्स
वर्षाकाठी ४४५०० अपत्ये
२०१८ - ४३,४२०
२०१९ - ४५,९१४
२०२० - ४४,१८५
कोट
जिल्ह्यात वर्षाला सरासरी ४८ हजार प्रसूती होतात. त्यापैकी तीन हजार प्रसूतींमध्ये नवजात बालकांचे मृत्यू, गर्भपात किंवा अन्य कारणांनी बालके जगात येऊ शकत नाहीत. गेल्या तीन वर्षांत जिल्ह्याचा जन्मदर स्थिर राहिला आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात तीनही वर्षांत ४४,५०० जन्मांची सरासरी कायम राहिली आहे.
- डॉ. विवेक पाटील, माता बालसंगोपन अधिकारी.