लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी त्यांच्या विचारांमधून सतत पर्यावरणपूरक भारतीय जीवन पद्धतीचे महत्त्व सांगितले. त्यामुळे त्यांचे हे विचार संचित सर्व जगाला, समाजाला मार्गदर्शक ठरणारे आहे, असे प्रतिपादन आ. सुधीर गाडगीळ यांनी व्यक्त केले.
गाडगीळ यांच्या कार्यालयात शनिवारी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी करण्यात आली. आ. गाडगीळ यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी गाडगीळ म्हणाले की, गायीचे दूध काढणे हे योग्य आहे. पण, गोचीड होऊन रक्त पिणे हे गायीचा नाश करणारे आहे. त्याप्रमाणे निसर्गाचा वापर गरजेपुरता करण्याचे विसरून सर्व जग निसर्गाचा विनाश करीत आहे. पर्यावरणाचा समतोल ढसळल्याने काय घडत आहे, ते सर्व जग सहन करीत आहे. अशा संकटकाळात उपाध्याय यांनी दाखविलेला मार्गच तारणार आहे.
यावेळी स्थायी समिती सभापती निरंजन आवटी, नगरसेवक संजय कुलकर्णी, संदीप आवटी, भाजपचे प्रदेश सदस्य शेखर इनामदार, दीपक माने, धीरज सूर्यवंशी, अशरफ वांकर, विनायक सिंहासने, अजिंक्य हंबर, गणपती साळुंखे आदी उपस्थित होते.