शहराच्या मुख्य भागात असूनही आपलेपणा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा चाैक म्हणून या चौकाची ओळख आहे. ३५ वर्षांपूर्वी गावभागात गर्द सावलीत अनेकजण गप्पांचा फड जमवत. याच गप्पांतून चौकात काहीतरी नवीन करण्याची इच्छा व्यक्त करण्यात आली आणि त्यावेळी सर्वप्रथम या चौकात वाचनालय सुरू करण्यात आले. वाचनालय तर सुरू झाले मात्र नाव काय द्यायचे, यावर चर्चा सुरू असतानाच सावलीत मिळतो तो ‘विसावा’ म्हणून ‘विसावा’ नाव देण्यावर एकमत झाले. आज याच नावाने असलेल्या मंडळाने अनेकविध उपक्रम राबवून ओळख निर्माण केली आहे.
ऐतिहासिक आयर्विन पुलावरून सांगलीत प्रवेश केला की, सर्वात प्रथम लागणारा चौक म्हणजे टिळक चौक. संपर्ण शहराचे अर्थकारणाचे केंद्र असलेल्या गणपती पेठेला लागूनच तिसऱ्या रस्त्याला हा चौक असल्याने शहरात याला महत्त्व आहे. पुलावरून उतरणीलाच दिसणारा प्रमुख बाजारपेठेचा रस्ता आणि तेथेच असलेला हा चौक लोकमान्य टिळक यांच्या आठवणींना उजाळा देणारा ठरत आहे. चौकातच टिळक स्मारक मंदिराची देखणी इमारत आहे. दोन वर्षांपूर्वी चौकाचे सुशोभिकरण करण्यात आले आहे.