सचिन लाड - सांगलीअपघात करून लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या संशयित वाहन चालकांचा वाहन चालविण्याचा परवाना (लायसन्स) निलंबित करण्याचा प्रस्ताव आरटीओंकडे सादर करण्याची तयारी वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी सुरू ठेवली आहे. गेल्या दोन वर्षात १ हजार ७११ अपघात झाले आहेत. यामध्ये ६४५ जणांचा बळी गेला आहे. या सर्वांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणारे चालकही ६४५ आहेत. त्यांच्याविरुद्ध न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याचा निकाल लागेपर्यंत त्यांचे लायसन्स निलंबित ठेवण्याचा हा प्रस्ताव आहे. त्यास येत्या पंधरा दिवसांत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. मात्र अपवाद वगळता रस्त्यांची लांबी-रुंदी तेवढीच राहिली आहे. प्रत्येकास पुढे जाण्याची घाई, वाहतूक नियमांचे पालन न करणे, ओव्हरटेक करणे, दारूच्या नशेत वाहन चालविणे, मोबाईलवर संभाषण करीत वाहन चालविणे, ट्रिपल सिट बसून जाणे, भरधाव वेगाने जाणे ही अपघात होण्याची प्रमुख कारणे आहेत. प्रत्येकाने वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघाताला आळा बसू शकतो. मात्र स्पर्धेच्या युगात नियम धाब्यावर बसवून रस्ता आणि आजूबाजूच्या स्थितीचा कोणताही अंदाज न घेता वाहनेचालविली जात आहेत. विशेषत: तरुण वर्ग रस्त्यावर आडवे-तिडवे भरधाव वेगाने वाहन चालविताना दिसतो. अपघातात बळी गेलेल्यांमध्ये तरुणांची संख्या मोठी आहे. पालकही आपल्या मुलांकडे लायसन्स व वाहतूक नियमांची माहिती आहे का नाही, याची चौकशी न करता वाहन घेऊन देत आहेत.दररोज कुठे ना कुठे अपघात होतो. दुचाकीवरून घसरून पडण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामागे भरधाव वेगाने जाणे, हे प्रमुख कारण आहे. आपल्यासह दुसऱ्याच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, याची जाणीव असूनही तरुण भरधाव वेगाने वाहन चालवित आहेत. अपघात करुन दुसऱ्याचा बळी घेणाऱ्या वाहनांत दुचाकी, रिक्षा, मोटार, ट्रक, डम्पर, एसटी या वाहनांचा समावेश आहे. अपघातग्रस्त वाहनाच्या चालकास अटक केली जाते; पण दुसऱ्यादिवशी तो जामिनावर बाहेर येतो. तो पुन्हा वाहन चालवून लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरू शकतो. यासाठी त्याचे लायसन्स निलंबित करण्याचा निर्णय पोलीसप्रमुख सावंत यांनी घेतला. त्यानुसार गेल्या दोन वर्षात अपघात करुन लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या ६४५ संशयित वाहन चालकांचे लायसन्स निलंबित करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचा आदेश त्यांनी वाहतूक पोलिसांना दिला आहे. अपघातांवर एक नजरजिल्ह्यात २०१३ मध्ये ८३२ अपघात होऊन ३२५ जणांचा बळी गेला, तर २०१४ मध्ये ८७९ अपघातात ३२० जणांचा बळी गेला आहे. या दोन्ही वर्षातील अपघातांच्या आकडेवारीची तुलना केल्यास, अपघात होण्याचे व लोक मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण कमी-जास्त असल्याचे दिसून येते.अपघातात बळी गेलेले अनेक लोक कुटुंबप्रमुख असतात. त्यांच्या जाण्याने त्यांचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते. अपघात करुन लोकांना मारण्याचे कुणाला लायसन्स दिलेले नाही. कायद्यातील त्रुटींमुळे संशयितांना फायदा मिळतो. ते पुन्हा वाहन चालविण्यास बसतात. यासाठी जोपर्यंत त्यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या खटल्याचा निकाल लागत नाही, तोपर्यंत त्यांचे लायसन्स निलंबित ठेवण्याचे प्रस्तावात सुचविणार आहे. त्यास आरटीओंकडून मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा आहे.- दिलीप सावंत, जिल्हा पोलीसप्रमुख अपघाताची ६४ ठिकाणेजिल्ह्यात सातत्याने होणाऱ्या अपघातांना आळा बसावा, यासाठी जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना अपघात होणाऱ्या ठिकाणांचा सर्व्हे करण्याचा आदेश दिला होता. या सर्व्हेमध्ये जिल्ह्यात सातत्याने अपघात होणारी ६४ ठिकाणे असल्याचे स्पष्ट झाले आहे. याठिकाणी काय उपाययोजना करायला हव्यात, हेही पोलिसांनी सुचविले आहे. या उपाययोजना सार्वजनिक बांधकाम विभागाने करायच्या आहेत. मात्र त्यांनी केवळ रस्त्यावरील झाडे तोडण्याशिवाय काहीच केले नाही. त्यामुळे अशा घटना घडतच आहेत.