अविनाश कोळी
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोना काळात खाद्यान्नाबाबत वाढलेली जागरुकता सेंद्रिय उत्पादनांसाठी लाभदायी ठरत आहे. त्यामुळे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारातील व्यापारवृद्धीला खतपाणी मिळाले आहे. देशातील सेंद्रिय शेती क्षेत्र १८ टक्क्यांनी वाढले असून, निर्यातीमध्ये ५१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र कृषी सेवा विभागाच्या मते भारतातील सेंद्रिय कृषी उत्पादनात २०२५पर्यंत मोठी वाढ होण्याची चिन्हे आहेत.
कोरोनामुळे भारतात आरोग्याबाबत जशी जागरुकता निर्माण झाली आहे, तशीच ती आंतरराष्ट्रीय स्तरावरही झाली आहे. यात पोषक अन्न घेण्याकडे नागरिकांचा कल वाढत आहे. त्याचाच परिणाम म्हणून सेंद्रिय अन्नपदार्थांना मागणी वाढली आहे. जगातील एकूण सेंद्रिय उत्पादनांच्या उलाढालीत भारताचा वाटा ३० टक्के इतका आहे. भविष्यात आंतरराष्ट्रीय बाजारात भारताचा दबदबा या उत्पादनातून वाढण्याची शक्यता आहे.
कृषी व प्रक्रियायुक्त अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण (अपेडा)ने दिलेल्या अहवालानुसार, भारतात सेंद्रिय उत्पादनांसाठी पोषक वातावरण तयार होत आहे. २०१९-२०मध्ये भारतीय सेंद्रिय उत्पादनांची एकूण निर्यात ४ हजार ६८५ कोटी ९० लाख रुपयांची झाली होती. २०२०-२१मध्ये ही निर्यात ७ हजार ७८ कोटी ७९ लाख इतकी म्हणजे ५१.०६ टक्क्यांनी वाढली.
उत्पादनांचा विचार केला तर भारतात २०१९मध्ये एकूण लागवडीखालील सेंद्रिय शेतीक्षेत्र ३६ लाख ६९ हजार ८०१ हेक्टर इतके होते. २०२०-२१मध्ये ते ४३ लाख ३९ हजार १८४ हेक्टरपर्यंत म्हणजेच १८ टक्क्यांनी वाढले. देशातील एकूण सेंद्रिय उत्पादनांमध्ये सर्वाधिक वाटा मध्य प्रदेशचा आहे. त्याखालोखाल राजस्थान, महाराष्ट्र, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर आदी राज्यांचा क्रमांक लागतो.
चौकट
चार वर्षांत मोठा बहर
अमेरिकेच्या परराष्ट्र कृषी सेवा विभागाने दिलेल्या अहवालानुसार, भारतातील सेंद्रिय अन्नधान्य उत्पादनाचा वार्षिक चक्रवृद्धी दर २०१६ ते २०२१ या काळात १० टक्के राहिला. तो येत्या चार वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढणार असून, या क्षेत्रातील एकूण उलाढाल ८० हजार १०७ कोटी ३८ लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
चौकट
आंतरराष्ट्रीय बाजारात भारताला संधी
जगातील एकूण सेंद्रिय शेती क्षेत्राच्या बाबतीत भारत जगात आठव्या क्रमांकावर असून, उत्पादकांच्या संख्येचा विचार केल्यास तो अव्वल आहे. भारतातील एकूण शेती क्षेत्राचा विचार केल्यास सेंद्रिय शेतीचे प्रमाण कमी आहे. त्यात वृद्धी झाल्यास सेंद्रिय उत्पादनांच्या आंतरराष्ट्रीय बाजारात भारत मोठा दबदबा निर्माण करु शकतो.