सांगली : विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या, तसेच परस्पर शवविच्छेदन तपासणी करणाऱ्या तिच्या सासरच्या मंडळींवर तातडीने गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी आज, गुरुवारी सांगलीत दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांनी मृतदेहासह आंदोलन केले. काल, बुधवारी सकाळी मृत झालेल्या या विवाहितेस न्याय मिळण्यासाठी संतप्त कार्यकर्त्यांनी, संबंधितांवर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेहाचे दफन न करण्याचा पवत्रा घेतल्याने पोलिसांची तारांबळ झाली. आज सायंकाळी कार्यकर्त्यांनी मृतदेह घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर जाण्याचा प्रयत्न केला; परंतु पोलिसांनी त्यांना राजवाडा चौकातच अडविल्याने एकच गोंधळ उडाला. रेश्मा राजू शेख (वय ३२, रा. पलूस) असे मृत विवाहितेचे नाव आहे. सुमारे आठ वर्षांपूर्वी रेश्माचे लग्न झाले होते. राजू हा पलूस येथे मजुरीचे काम करतो. माहेरच्या नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार काही महिन्यांपासून सासरच्या मंडळींनी रेश्माकडे माहेरहून पैसे आणण्यासाठी तगादा लावला होता. तसेच तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला होता. मंगळवारी (दि. २७) रेश्माला मारहाण करण्यात आली. त्यामध्ये ती गंभीर जखमी झाल्याने तिला राजू शेख याने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले; पण उपचार सुरूअसताना तिचा काल मृत्यू झाला. सासरच्या मंडळींनी तेथे शवविच्छेदन न करता तिचा मृतदेह पलूसला नेला व त्यानंतर माहेरच्या लोकांना रेश्माचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. रेश्माच्या इचलकरंजी येथील नातेवाइकांनी पलूसला धाव घेतली असता, तिच्या दफनविधीची तयारी पूर्ण झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तेव्हा माहेरच्या लोकांनी सासरच्या मंडळींकडे तिच्या मृतदेहाच्या विच्छेदन अहवालाची मागणी केली. त्यावेळी त्यांनी शवविच्छेदन केले नसल्याचे सांगितले. दरम्यान, हा प्रकार दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांना समजताच त्यांनीही पलूस येथे घटनास्थळी धाव घेतली. माहेरच्या लोकांचा आक्रमक पवित्रा पाहून अखेर सासरच्या मंडळींनी मृतदेहाचे विच्छेदन तपासणी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पुन्हा बुधवारी (दि. २८) दुपारी मृतदेह मिरज शासकीय रुग्णालयात आणण्यात आला. अखेर आज पहाटेच्या सुमारास शवविच्छेदन करण्यात आले; परंतु त्यावेळी माहेरचे नातेवाईक रुग्णालयात नव्हते. परस्पर मृतदेहाची विच्छेदन तपासणी केली, तसेच विवाहितेच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याप्रकरणी सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी दलित महासंघाने केली आहे. प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न करणाऱ्या पलूस पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. पोलीस-कार्यकर्त्यांत वादआज सायंकाळी विवाहितेचा मृतदेह घेऊन माहेरच्या नातेवाइकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला; परंतु शहर पोलिसांनी त्यांना राजवाडा चौकातच अडविले. यावेळी तेथे पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात वादावादी झाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक राजू मोरे यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलक शहर पोलीस ठाणे परिसरात जमा झाले. मृतदेह शववाहिकेत ठेवला; परंतु जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह हलविणार नसल्याचा पवित्रा घेतला होता. मृतदेह अजूनही दफनविधीच्या प्रतीक्षेत आहे.
महिलेचा मृतदेह दोन दिवस ताटकळत
By admin | Updated: January 29, 2015 23:54 IST