मिरज : मिरजेतील अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सवाच्या ६० व्या वर्षानिमित्त दि. २५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबरपर्यंत नवरात्र संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री श्रीपाद नाईक यांच्याहस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. महोत्सवात यावर्षी ख्यातनाम गायिका शुभा मुदगल, मंजिरी असनारे, कलापिनी कोमकली, व्यंकटेशकुमार सहभागी होणार आहेत.अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सव गेली ५९ वर्षे मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे गायक-वादक अंबाबाई नवरात्र संगीत सभेत हजेरी लावतात. यंदाही दिग्गज कलाकारांना आमंत्रित करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्याहस्ते उद्घाटन होणार आहे. १९५४ मध्ये अंबाबाई मंदिरात सुरू झालेल्या या महोत्सवास साठ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त ख्यातनाम गायिका शुभा मुदगल, मंजिरी असनारे, कलापिनी कोमकली, व्यंकटेशकुमार संगीत सभेत सहभागी होणार आहेत. यापूर्वी पंडित भीमसेन जोशी, फिरोज दस्तूर, आब्बान मेस्त्री यांच्यासह देशातील दिग्गज कलाकारांनी या महोत्सवात संगीत सेवा केली आहे. महोत्सवानंतर वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून झाकीर हुसेन, राजन मिश्रा यांच्यासह अनेक कलाकार उपस्थित राहणार आहेत. कलाकारांच्या राज्यस्तरीत संगीत स्पर्धेचेही आयोजन करण्यात येणार आहे. संगीत महोत्सवात मिरजेचे संगीतकार ‘राम कदम पुरस्कार’ यंदा नटसम्राट बालगंधर्व यांच्या भूमिकेबद्दल सुबोध भावे यांना देण्यात येणार आहे. प्रसिध्द पार्श्वगायक मंगेश बोरगावकर यांचेही गायन होणार आहे. ‘विख्यात तबलावादक डॉ. अबन मेस्त्री पुरस्कार’ महिला तबला वादक रत्नश्री कोट्टीयम (केरळ) यांना देण्यात येणार असल्याचे अध्यक्ष मधुभाऊ पाटील यांनी सांगितले. (वार्ताहर)
अंबाबाई नवरात्र संगीत सभा २५ पासून
By admin | Updated: September 11, 2014 23:08 IST