कडेगाव तालुक्यातील चिंचणी ग्रामीण रुग्णालयात लसीकरणासाठी नागरिकांची झालेली गर्दी.
लोकमत न्यूज नेटवर्क
कडेगाव : कडेगाव तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटत नाहीये. बुधवारी एकाच दिवसात १५० रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. लॉकडाऊन असूनही रुग्णसंख्या कमी का होत नाही, याचा उलगडाच होत नाही. दुसरीकडे मृत्यूची संख्याही आता १०२ पर्यंत गेली आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे एकट्या कडेगाव शहरात व तालुक्यात मिळून जवळपास १८ हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात प्रशासनाला यश आले आहे.
दररोज ५०० जणांच्या चाचण्या व त्यात १०० हून अधिक रुग्ण पॉझिटिव्ह, हे कडेगावचे समीकरणच बनले आहे.
कडेगाव ग्रामीण रुग्णालय व चिंचणी ग्रामीण रुग्णालय येथे प्रत्येकी ३० ऑक्सिजन बेड्सचे डेडिकेटेड कोविड केअर सेंटर सुरू आहे. याशिवाय राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी भारती विद्यापीठ आणि हॉस्पिटलच्या माध्यमातून ३० बेडचे कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. याशिवाय कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी चिंचणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलींच्या शासकीय वसतिगृहात ३० बेड्सचे कोविड केअर सेंटर सुरू आहे.
रुग्णांचे पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण जोपर्यंत कमी येत नाही, तोपर्यंत परिस्थिती आटोक्यात आहे असे म्हणता येत नाही. आजपर्यंतची एकूण रुग्णसंख्या पाच हजार २७९ वर गेली असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या चार हजार ३०८ झाली आहे. सध्या ८६९ रुग्ण उपचाराखाली आहेत. प्रांताधिकारी डॉ. गणेश मरकड, तहसीलदार डॉ. शैलजा पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आशा चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात कोरोना नियंत्रणासाठी उपाययोजना राबविल्या जात आहेत.
चौकट
लसीकरणासाठी गर्दी
तालुक्यातील चिंचणी व कडेगाव ग्रामीण रुग्णालये तसेच मोहित्यांचे वडगाव, खेराडे (वांगी), हिंगणगाव (बुद्रुक) या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये व सर्व उपकेंद्रांमध्ये कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.