तासगाव : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर आहे. भाजपच्या खासदार आणि आमदारांनी जिल्ह्यातील सिंचन योजनांसाठी ५० कोटींची मागणी केली आहे. लवकरच राज्यपालांसमोर बैठक घेऊन ५० कोटींचा निधी देणार असल्याचे आश्वासन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिले. याचवेळी जिल्ह्याला एक मंत्रीपद निश्चित असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.येथील मंगल कार्यालयात भाजपचा कार्यकर्ता मेळावा आणि पक्षप्रवेशाचा कार्यक्रम प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी खासदार संजयकाका पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार सुरेश खाडे, आमदार विलासराव जगताप, आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार भगवानराव साळुंखे, दिनकरतात्या पाटील, रमेश शेंडगे, पृथ्वीराज देशमुख, डॉ. प्रताप पाटील, गोपीचंद पडळकर, जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड, शेखर इनामदार, मकरंद देशपांडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष दानवे म्हणाले की, मराठवाड्यासारखीच सांगली जिल्ह्याची दुष्काळी परिस्थिती आहे. खासदार संजयकाका आणि भाजपच्या आमदारांनी सिंंचन योजनांसाठी ५० कोटींची मागणी केली आहे. यावर्षी राज्य शासनाने ७८ कोटींचा निधी दिला आहे. तरीही राज्यपालांकडे बैठक बोलावून जिल्ह्यासाठी ५० कोटी मिळवून देणार आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम आहे. मागीलवर्षी भाजपच्या सरकारने शेतकऱ्यांना सात हजार कोटींची मदत दिली होती. आघाडी सरकारने पंधरा वर्षात आठ हजार कोटींची मदत दिली आहे. ७० हजार कोटी खर्चून केवळ एक टक्का सिंंचन योजना पूर्ण केली आहे. हा पैसा अधिकारी आणि आघाडी सरकारच्या नेत्यांच्या घरात गेला आहे. रायगड जिल्ह्यातील अधिकाऱ्यांवर कारवाई झाली आहे. आता पैसे खाणाऱ्या नेत्यांची जेलमध्ये जाण्याची वेळ आली आहे. मागील सरकारसारखे आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही.तासगाव बाजार समितीच्या निवडणुकीत दगडफेकीची घटना घडली. राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी दादागिरी खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला. मात्र त्यांना माझे नाव घेण्याचे धाडस झाले नाही. तसेच या घटनेनंतर पतंगराव कदमांना राष्ट्रवादीचा पुळका आला. गैरफायदा घेण्याचा प्रयत्न सुरु झाला. पतंगरावांनी पैशाला महत्त्व देऊन संस्था मोठ्या केल्याचा आरोप खासदार संजय पाटील यांनी यावेळी केला. दुष्काळी परिस्थितीसाठी शासनाकडून निधीची अपेक्षा असून जिल्ह्याला मंत्रीपद द्यावे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी डॉ. प्रताप पाटील, गोपीचंद पडळकर, हायुम सावनूरकर यांनीही मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)दोन्ही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा प्रवेशमेळाव्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्या उपस्थितीत तासगाव तालुक्यातील जिल्हा बँकेचे संचालक डॉ. प्रताप पाटील, प्रा. डी. ए. माने, राष्ट्रवादीचे कवठेमहांकाळचे अनिल शिंंदे, हायुम सावनूरकर, दादासाहेब कोळेकर, काँग्रेसचे मुन्ना कुरणे, ‘तासगाव अर्बन’चे अध्यक्ष महेश हिंगमिरे, सलीम पडळकर, सुशांत रजपूत, बीरेंद्र थोरात, निखिल नाईक, दत्तात्रय खोत (वंजारवाडी), सुनील दौंड (वंजारवाडी), विकास पाटील (नेहरुनगर), सुनील पाटील (ढवळी), नवनाथ पाटील, महंमद तांबोळी, दगडू शिरतोडे, हितेश पाटील यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.मंत्रीपदाचा चेंडू आमदार, खासदारांकडे टोलविलाएकेकाळी राज्याचे निर्णय सांगलीतून घेतले जायचे. तशी परिस्थिती नसतानादेखील आता भाजपचे चार आमदार आणि एक खासदार निवडून आले आहेत. आता या सर्वांना मंत्रीपद मिळायला हवे असे वाटते, असे सांगत प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी, जिल्ह्याला एक मंत्रीपद निश्चित असल्याचे सांगितले. मात्र हे मंत्रीपद केंद्रात द्यायचे की राज्यात, हे ठरवून त्यांचे नाव तुम्हीच सांगा, असे सांगून, मंत्रीपदाचा दावेदार निश्चितीचा चेंडू त्यांनी आमदार, खासदारांकडे टोलविला.
सिंचन योजनांसाठी जिल्ह्याला ५० कोटी देणार
By admin | Updated: August 28, 2015 22:56 IST