सांगली : सांगली, मिरजेतील शासकीय रुग्णालयांसह जिल्हाभरातील उपजिल्हा रुग्णालयांत अग्निशमन यंत्रणांसाठी सुमारे साडेचार कोटींचे अंदाजपत्रक सार्वजनिक बांधकाम विभागाने पाठविले आहे; पण शासनाने ढुंकूनही पाहिलेले नाही. आता भंडाऱ्यातील दुर्घटनेनंतर शासनाला आठवण आली आहे. दरम्यान, शासकीय रुग्णालयांच्या फायर व इलेक्ट्रिक ऑडिटसंदर्भात मंगळवारी (दि. १२) जिल्हाधिकाऱ्यांनी सिव्हिल व सार्वजनिक बांधकामसह संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.
मंत्रालयातील आगीनंतर रुग्णालयांचेही ऑडिट झाले होते. त्यानुसार २०१८ मध्ये खर्चाचे अंदाजपत्रक मंत्रालयात पाठविले गेले. पण, ते बासनात पडले. कोल्हापुरात सीपीआरमध्ये कोरोना काळात आगीच्या दुर्घटनेनंतर ऑडिट अहवालाची पुन्हा आठवण झाली. तो नव्याने पाठविण्याचे आदेश मुंबईतून आले. त्यामुळे २९ सप्टेंबर २०२० रोजी सांगली व मिरज रुग्णालयांसाठीचे अहवाल पुन्हा पाठविले गेले. त्यावरही विचार झाला नाही. आता भंडाऱ्यात जळीत झाल्यानंतर पुनश्च जाग आली आहे.
चौकट
सांगली-मिरजेत हायड्रंट प्रणाली आवश्यक
सांगली व मिरज शासकीय रुग्णालयांत अग्निशमन यंत्रणेसाठी हायड्रंट प्रणाली आवश्यक आहे. इमारतींच्या आंतर्भागात लाल रंगाची पाण्याची पाईप सर्वत्र फिरविली जाते. ठिकठिकाणी आऊटलेट दिले जातात. जमिनीखाली दीड लाख लिटरच्या पाण्याच्या टाक्या तयार केल्या जातात. उपशासाठी साडेसात अश्वशक्तीचे दोन पंप प्रत्येक टाकीजवळ बसवावे लागतात. दुर्घटनेवेळी या यंत्रणेतून पाण्याचा जोरदार मारा केला जातो. ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांत फायर अलार्म व फायर फायटर पुरेसे असल्याचे अहवालात म्हटले आहे.
चाैकट
पंधरा रुग्णालयांसाठी साडेचार कोटी
सार्वजनिक बांधकामच्या अंदाजपत्रकानुसार सांगली, मिरजेतील दोन शासकीय रुग्णालये आणि तेरा ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांत अग्निशमन यंत्रणेसाठीचा खर्च असा आहे.
- सांगली सिव्हिल : १ कोटी ६७ लाख ५२ हजार ४४४ रुपये
- मिरज सिव्हिल : १ कोटी ६२ लाख ५३ हजार ४८५ रुपये
- ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालये - १ कोटी १८ लाख ४७ हजार ६६१ रुपये
- एकूण अपेक्षित खर्च : ४ कोटी ४८ लाख ५३ हजार ५९० रुपये
----------