चिपळूण : शहरातील पश्चिम भागात बुधवारी सायंकाळी वादळी वारा व पावसाचा सर्वाधिक फटका गोवळकोट, उक्ताड, खेंड, कांगणेवाडी या परिसराला बसला. गोवळकोट रोड येथे शंभरहून अधिक पोल वादळी वार्याने वाकल्याने या भागातील वीज पुरवठा खंडित झाला आहे, तर विविध भागात पडलेली झाडे तोडण्याचे काम नगर परिषद प्रशासनातर्फे सुरु आहेत. वीजखांब कोसळल्याने महावितरणला सर्वाधिक फटका बसला आहे. नगराध्यक्ष रिहाना बिजले, मुख्याधिकारी प्रकाश पाटील, तहसीलदार वृषाली पाटील, आरोग्य समिती सभापती आदिती देशपांडे, माजी नगराध्यक्ष सावित्री होमकळस, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते राजेश देवळेकर, महिला बालकल्याण समितीच्या सभापती शिल्पा सप्रे-भारमल, महिला मागासवर्गीय समितीच्या सभापती तेजश्री संकपाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, शिक्षण समिती सभापती निर्मला चिंगळे, शिवसेनेचे शहरप्रमुख भगवान शिंदे, नगरसेवक राजेश देवळेकर, नगरसेवक सुरेखा खेराडे, बांधकाम सभापती बरकत वांगडे, माजी बांधकाम सभापती शहाबुद्दिन सुर्वे, उपनगराध्यक्ष लियाकत शाह, पाणी पुरवठा सभापती कबीर काद्री, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दादा बैकर आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. नुकसानग्रस्तांना तातडीने मदत मिळण्याबाबत तहसील कार्यालयातर्फे तातडीने उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. वादळी वार्याने उक्ताड गणेश मंदिर येथील पत्र्याची शेड व स्मशानभूमीवरील पत्रेही उडून गेले आहेत. पांडुरंग सनगरे, रमेश गोरिवले यांच्या घराचेही नुकसान झाले आहे. रवींद्र जोगळे यांच्या घराची पत्राशेडही उडाली आहे. गोवळकोट बौद्धवाडी येथेही घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशोक सकपाळ, गंगाधर तांबे, रवींद्र सकपाळ, राजाराम जाधव यांचा यामध्ये समावेश आहे. कांगणेवाडी येथे दिनेश वीर, संगीता पाष्टे, राजेश बुरटे, शंकर बुरटे, दिलीप मोरे यांच्याही घराचे नुकसान झाले आहे. काही ग्रामस्थांनी शासनाच्या मदतीची अपेक्षा करण्यापेक्षा स्वत: पुढाकार घेऊन दुरुस्तीचे काम हाती घेतले. गोवळकोट परिसरात १००हून अधिक विजेचे खांब वाकले असून, काही दिवसांपूर्वीच नवीन वीजखांब या भागात टाकण्यात आले होते. हे खांब निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. या कामाची चौकशी करावी, अशी मागणीही गोवळकोट परिसरातून होत आहे. गोवळकोट भागातील वीज सुरळीत करण्यासाठी अजूनही दोन ते तीन दिवस लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याचप्रमाणे शहरातील विविध भागात पडलेली झाडे तोडण्याचे काम बारा तासांहून अधिक काळ नगर परिषद कर्मचारी यांच्या मदतीने सुरु होते. वादळी वारा व पावसाचा तडाखा पाणीपुरवठा योजनेवरही झाला आहे. आज शहर व परिसरात सकाळचा पाणीपुरवठा झाला नाही. तसेच नेहमी प्रभागात फिरणारी घंटागाडीही आली नाही. एकंदरीत वादळी वार्याचा परिणाम दैनंदिन कामकाजावरही झाला. सायंकाळी उशिरा हाती आलेल्या वृत्तानुसार, चिपळुणातील ३९ गावात ३४८ घरांचे अंशत: मिळून २९ लाख ३३ हजार ५१५ रुपये, १८ गोठ्यांचे १ लाख ७ हजार ७७५ रुपयांचे नुकसान झाले.कात्रोली येथे एका बैलाचा या वादळी पावसामुळे मृत्यू झाला. (वार्ताहर)
पश्चिम चिपळूणला अधिक तडाखा अवकाळी पाऊस : झाडे तोडण्याचे काम युध्दपातळीवर सुरु
By admin | Updated: May 9, 2014 00:21 IST