सुभाष कदम - चिपळूण -ग्रामीण भागातील पाणीटंचाईची समस्या लक्षात घेऊन जलयुक्त शिवार अभियान राबवण्यात येत आहे. चिपळूण तालुक्यात या अभियानाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. तालुक्यातील पाच गावांमधील ६५ कामे पूर्ण झाली आहेत. चिपळूण तालुक्यातील कोसबी, केतकी, अनारी, गाणे, कात्रोळी या गावांचा जलयुक्त शिवार अभियानात समावेश आहे. या पाच गावातून ६५ कामे झाली. त्यामध्ये केतकी येथे अंगड दगडी बांध २, सिमेंट बंधारा १, समपातळी सलग चर ८ व शेततळे १ ही कामे झाली आहेत. कोसबीमध्ये ५ अंगड दगडी बांध, २ सिमेंट वळण बंधारे, ३ बंधाऱ्यातील गाळ काढणे, ३ ठिकाणी समपातळी सलग चर मारण्यात आले आहेत. कात्रोळी येथे अंगड दगडी बांध २, शेततळे २, समपातळी सलग चर १५, मसगी २ ही कामे झाली. गाणे येथे अंगड दगडी बांध ५, सिमेंट नाला बंधारा १, सिमेंट वळण बंधारा १, शेततळे १, बंधाऱ्यातील गाळ काढणे १, अनारी येथे अंगड दगडी बांध ८, नाल्यातील गाळ काढणे १ अशी एकूण ६५ कामे झाली आहेत. शाश्वत शेतीसाठी पाणी व पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करुन देण्यासाठी जलसंधारणअंतर्गत उपाययोजना एकात्मिक पद्धतीने सर्व विभागाच्या समन्वयाने नियोजनबध्द आराखडा तयार करुन पिण्याचे पाणी व विकास संरक्षण सिंचन देण्याची व्यवस्था करता येईल. महाराष्ट्र २०१९ यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाचे जास्तीत जास्त पाणी गावात शिवारातच अडविणे, भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करणे, विकेंद्रित पाणीसाठे निर्माण करणे, पाणी साठवण क्षमता निर्माण करणारी नवीन कामे हाती घेणे, अस्तित्त्वात असलेली व रिकामी झालेली जलस्रोतांची पाणी साठवण क्षमता पुनर्स्थापित करणे, पाणी अडविणे व जिरवणे, याबाबत जनतेला प्रोत्साहित करुन लोकसहभाग वाढविणे ही या अभियानाची उद्दिष्टे आहेत. अंगड दगडीबांध घालणे, जुनी भातशेती दुरुस्ती करणे, सिमेंट बंधारे बांधणे, मातीचे बंधारे बांधणे, शेततळी बांधणे, जुने बांध दुरुस्त करणे अशी कामे केली जातात.
जलयुक्त शिवार तहान भागविणार
By admin | Updated: July 18, 2015 00:14 IST