पाचल : श्री नवलाई-रामेश्वर पाणी वापर संस्था तळवडे व येथील शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार पाटबंधारे बांधकाम रत्नागिरी यांनी अर्जुना धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
मागील वर्षी भरपूर पाऊस पडूनही यावर्षी पाचल पूर्व भागात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. नदी-नाले व विहिरीने पूर्णपणे तळ गाठला आहे. काही शेतकऱ्यांनी केलेली उन्हाळी शेतीही करपू लागली होती. त्यामुळे धरणातील पाणी सोडण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. अखेर तळवडे पाणी वापर संस्था व शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार पाटबंधारे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सलगर यांनी डाव्या कालव्याला पाणी सोडल्याने सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात येत आहे. कालव्यातून सोडलेल्या पाण्यामुळे परिसरातील विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊ लागली आहे. अर्जुना नदीत पाणी सोडल्याने नदीकाठच्या सुमारे २० ते २५ गावांना याचा लाभ होणार आहे.