सुभाष कदम ल्ल चिपळूण रत्नागिरी जिल्ह्यात वस्ती विरळ आहे. दोन वस्त्यांमधील जंगलांचे प्रमाणही चांगले आहे. परंतु, बेसुमार वृक्षतोड आणि सतत लागणारे वणवे यामुळे जंगलातील विविध जातीच्या प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. त्यामुळे ‘जीवो जीवस्य जीवनम्’ या उक्तीआधारे जगणाऱ्या प्राण्यांची सध्या आबाळ झाली आहे. त्यातूनच जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यात २ बिबट्यांचा भुकेने मृत्यू झाला आहे.कोकणात देवरहाटी व जंगलाचे प्रमाण मोठे आहे. दरवर्षी येथे बऱ्यापैकी लागवडही केली जाते. त्यामुळे येथील नैसर्गिक सुबत्ता कायम असून, येथे बऱ्यापैकी गारवा असतो. कोकणातील शेतकऱ्यांची उपजीविका निसर्गावरच चालते. त्यामुळे येथील काही प्रमाणात अर्थकरण जंगलावर अवलंबून आहे. पण बरीचशी जमीन पडीक असल्याने पावसाळ्यात तेथे गवत उगवते. उन्हाळ्यात या गवताला आग लावली जाते. त्यामुळे वणवे भडकतात. अनेक दुर्मीळ वनस्पती, दुर्मीळ जातीचे पशु-पक्षी आगीच्या भक्ष्यस्थानी पडतात. यामुळे या लहान जीवांवर जगणाऱ्या बिबट्यासारख्या मोठ्या प्राण्यांवर उपासमारीची वेळ येते. जंगलात उपजीविकेचे साधन नसल्याने बिबटे आता मानवी वस्तीकडे येऊ लागले आहेत. दापोली तालुक्यातील उर्फी गावी एप्रिलमध्ये भुकेने मृत्युमुखी पडलेला बिबट्या आढळला होता. लकवा झाल्याने हा बिबट्या स्वत: शिकार करु शकत नव्हता. त्यामुळे त्याची खाण्याची आबाळ झाली होती. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता.चिपळूण तालुक्यातील पोसरे गावी रविवारी सकाळी अविनाश शिर्के या तरुणावर उपाशीपोटी असलेल्या बिबट्याच्या मादीने झडप घातली. परंतु, हा उपाशी बिबट्या तारेच्या कंपाऊंडमध्ये अडकल्यामुळे पोटाला गंभीर इजा झाली व अती रक्तस्त्रावामुळे या बिबट्याचा मृत्यू झाला. बिबट्या उपाशी असल्यामुळेच ही घटना घडली.
जिल्ह्यात दोन बिबट्यांचा भूकबळी
By admin | Updated: July 8, 2014 00:19 IST