केवळ चूल व मूल यावरच न थांबता ग्रामीण भागातील महिलांना बाहेरच्या जगाचे व्यावहारिक ज्ञान व्हावे, स्वयंरोजगारातून आर्थिक उन्नती साधावी, याकरिता महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी मालती सुंदर जाधव या महिलेने पुढाकार घेतला. वैद्यकीय क्षेत्रातून सेवानिवृत्त झाल्यानंतर आर्थिक सक्षम करण्यासाठी १० वर्षांपूर्वी १८ महिलांना एकत्र करुन ५० रुपये भाग भांडवलाच्या स्वयंसिद्धा महिला बचत गटाची निर्मिती केली. आज या बचत गटाची लाखो रुपयांची उलाढाल असून, या बचत गटातील महिलांनी स्वत:ला सिद्ध केले आहे.दापोली तालुक्याच्या पालगड गावातील गरीब व गरजू १८ महिलांना एकत्र करण्याचे काम मालती सुंदर जाधव या सेवानिवृत्त परिचारिकेने केले. सेवाभावी वृत्तीच्या या महिलेने मिळणाऱ्या पेन्शनवर जगण्याऐवजी आपल्याप्रमाणेच इतरांचे संसार सुखी व्हावेत, हाताला काम व दाम मिळावे, महिलांनी केवळ चूल व मूल एवढ्यावर थांबू नये, तर स्वत:ला सिद्ध करण्यासाठी घराबाहेर पडावे, यासाठी प्रयत्न सुरु केले. ५ फेब्रुवारी २००५ रोजी स्वयंसिद्धा नावाचा १८ महिलांचा बचत गट स्थापन केला. बचत गटाच्या संस्थापक अध्यक्षा सुशिक्षित असल्याने व त्यांनी ३५ वर्षे मुंबई येथे नोकरी केल्यामुळे त्यांना बाहेरचे जग माहिती होते. गावातील महिलांनी पुढे येऊन स्वत: व्यवसाय करावा, महिला बचत गटासाठी शासन मदत करते. परंतु महिलांनी पुढे येण्याची गरज आहे, असे महिलांना समजावून सांगून महिलांमध्ये जागृती निर्माण करण्याचे काम त्यांनी केले.स्वयंसिद्धा महिला बचत गटात अध्यक्ष मालती जाधव, उपाध्यक्ष अश्विनी जाधव, खजिनदार दीपाली जाधव, सचिव सिद्दी मोरे, रसिका जाधव, शालिनी जाधव, शैलजा पाटणे, दीपाली पाटणे, भारती शिंदे, लक्ष्मीबाई शिंदे, रुक्मिणी शिंदे, अनिता सालेकर, सुमती पवार, मनाली मोरे, साक्षी जाधव, सुनंदा जाधव या महिला सदस्य आहेत. या महिलांनी स्वत:च्या भागभांडवलापासून सुरुवात केली. मात्र, महिला बचत गटाने दोनवेळा रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून अर्थसहाय्य घेऊन आपला उद्योग मोठ्या प्रमाणात सुरु ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. बचत गटातील महिलांना रोजगार मिळावा म्हणून कॅटरिंगचा व्यवसाय सुरु केला आहे. लग्न, वाढदिवस, कोणत्याही समारंभात जेवणाची आॅर्डर घेऊन या सर्व महिला एकजुटीने कॅटरिंगचा व्यवसाय करत असतात. लोणचे, पापड, मिरची मसाला तयार करुन स्थानिक बाजारपेठ, गाव व पंचक्रोशीत विकला जातो.तालुक्याच्या ठिकाणाहून किराणा, कांदा, बटाटे जीवनावश्यक लागणाऱ्या वस्तू घाऊक दरात आणून गावात त्याची विक्री केली जाते. सहकाराच्या माध्यमातून एकत्रितपणे काम करुन त्यातून मिळणाऱ्या नफ्याचे एकत्र समप्रमाणात विभागणी केली जाते. दैनंदिन मजुरी बाजूला काढून बचत गटाचे भांडवल अबाधित ठेवले जाते. एखाद्या महिलेला आर्थिक अडचण भासल्यास बचतगट मदत करते.बचत गटाच्या माध्यमातून महिला शिबिर, सहली, उद्योग भेट, कृषी विद्यापीठातील लघु उद्योगाला भेट देणे, महिला मेळावे, महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी सर्व महिला एकत्र येऊन गावात हा उपक्रम राबवला जातो. एकीच्या बळावर या महिलांची भरभराट होत आहे. भविष्यात सहकार तत्त्वावर महिला उद्योग सुरु करण्याचा स्वयंसिद्धा महिला बचत गटाचा मानस आहे.- शिवाजी गोरेआत्मविश्वास वाढला की सारे...ग्रामीण भागातील महिलांना मार्गदर्शन मिळाले, त्यांच्यात आत्मविश्वास वाढला की त्याही इतर व्यवसायात भरारी घेतानाच या गटाने विविध योजनांचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला आहे. समर्थ नेतृत्व असले की, महिला विकासाचा वेलू कसा गगनावर नेऊन ठेवतात, याचे हे उदाहरण आहे. केवळ चूल आणि मूल इथवर न थांबता ग्रामीण भागातील महिला आता स्वयंपूर्णतेकडे वळल्या आहेत. पालगडमधील स्वयंसिद्धा बचत गटाने उत्पादनच्या वेगवेगळ्या मध्यमातून यशाचा मार्ग चोखाळला आहे. हा आदर्श इतरांनीही घ्यावा.दापोली तालुक्यातील पालगडमध्ये केटरिंगच्या माध्यमातून महिला बचत गटाने लाखोंची उलाढल केली. मालती जाधव, अश्विनी जाधव व सहकाऱ्यांनी बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक उन्नती कशी साधता येते, याचा मार्ग इतरांना दाखवला आहे.बचत गटाच्या आशाआकांक्षा विस्तारित होत असल्याने आता नव्या संकल्पना घेऊन हा बचत गट कोकण विभागातही अनेक संस्थांना मदत करणार आहे. महिला एकत्रित येऊन स्वयंसिद्ध बनतात. याचे प्रतिक म्हणजे हा बचत गट होय.आधारवड
स्वयंसिध्दा करतेय लाखो रुपयांची उलाढाल
By admin | Updated: July 24, 2015 00:39 IST