चिपळूण : येथील नगर परिषदेची विशेष सभा दि. २४ रोजी सायंकाळी ४ वाजता श्रावणशेठ दळी सभागृहात होणार असून, या सभेत २०१५-१६ च्या अंदाजपत्रकावर चर्चा केली जाणार आहे. उत्पन्नवाढीसाठी नागरिकांवर शौचालयाच्या स्वच्छतेवर व करमणूक कर लादला जाणार आहे. पाणी विभाग तोट्यात असल्याचे या अंदाजपत्रकात नमूद करण्यात आले असल्याचे समजते.नगराध्यक्षा सावित्री होमकळस यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होत असून, २०१५-१६च्या अंदाजपत्रकाला मंजुरी घेतली जाणार आहे. सुरुवातीची शिल्लक ११ कोटी ९१ लाख ९५ हजार ९०० रुपये असून, जमा ३६ कोटी ५१ लाख ३२ हजार रुपये आहे. खर्च ३८ कोटी १३ लाख २६ हजार रुपये आहे. अपेक्षित शिल्लक १० कोटी ३० लाख १ हजार ९०० रुपये असून, एकूण ४८ कोटी ४३ लाख २७ हजार ९०० रुपयांचे हे अंदाजपत्रक आहे. उत्पन्नवाढीसाठी शहरात असणाऱ्या मोबाईल टॉवरचा सर्व्हे करुन त्यावर कर आकारणी केली जाणार आहे. त्याचप्रमाणे मटण-मच्छी मार्केट, भाजी मंडई सुरु करुन गाळे भाडेतत्त्वावर देण्याचा प्रस्तावही ठेवण्यात आला आहे.गेली अनेक वर्षे इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र दुरुस्तीच्या नावाखाली बंद असून, ते सुरु झाल्यास उत्पन्नवाढीसाठी मदत होईल, असेही सुचविण्यात आले आहे. शहरातील अण्णासाहेब खेडेकर क्रीडा संकुलाचे अद्याप मूल्यांकन झालेले नसताना व्यावसायिक क्रीडा स्पर्धा, राजकीय पक्षांच्या सभा, विवाह सोहळा व अन्य कार्यक्रमांच्या माध्यमातून उत्पन्न कसे वाढेल, याबाबत अर्थसंकल्पात तरतूद असून, तोट्यात असणाऱ्या पाणी योजनेवर उपाय म्हणून नळांना मीटर बसवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या अंदाजपत्रकात सुरुवातीची शिल्लक ११ कोटी ९१ लाख ९५ हजार ९०० रुपये आहे. अपेक्षित जमा ३५ कोटी ५१ लाख ३२ हजार रुपये असून, अपेक्षित खर्च ३८ कोटी १३ लाख २६ हजार दाखवण्यात आला असून अपेक्षित जमा ४८ कोटी ४३ लाख २७ हजार रुपये व अपेक्षित शिल्लक १० कोटी ३० लाख १ हजार ९०० रुपये दाखविण्यात आली आहे. या अंदाजपत्रकावर होणाऱ्या विशेष सभेत शिक्कामोर्तब होणार आहे.नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागातर्फे संपूर्ण शहराला पाणी पुरवठा केला जातो. गेल्या वर्षीच्या अंदाजपत्रकात पाणी पुरवठा योजनेवरील तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना सुचवण्यात आली होती. त्यामध्ये मीटर पद्धतीने पाणी पुरवठा करण्यात यावा, विजेचा प्रभावी वापर करुन वीजबिलात कपात करावी, नवीन जलवाहिन्या बसवणे, जुन्या वाहिन्या तत्काळ बदलणे यांसारखी कामे एकात्मिक पद्धतीने शासनाच्या योजनेतून हाती घेऊन नगर परिषद निधीमधील खर्चाचे प्रमाण कमी करावे, थकबाकी वसुलीसाठी विशेष मोहीम राबवून थकबाकीचे प्रमाण कमी करावे, अनधिकृत १४ जोडण्या शोधून त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी, अशा उपाययोजना सुचवण्यात आल्या होत्या.मात्र, प्रत्यक्षात यावर्षी देखील त्याची अंमलबजावणी झालेलीनाही अशा उपायांकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)शहरामध्ये नगर परिषद आरोग्य विभागातर्फे स्वच्छता केली जाते. या अंदाजपत्रकात चालू वर्षापासून शौचालयासाठी प्रत्येक नागरिकावर कर लादला जाणार आहे. त्याचप्रमाणे इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र बंद असतानाही करमणूक कर घेतला जाणार असल्याने नगर परिषदेचे हे अंदाजपत्रक सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारेच ठरणार असल्याची चर्चा आहे. चिपळूण शहरमधील नागरिकांवर करांचे ओझे लादले जाणार काय, याकडे लक्ष लागले आहे. चिपळूण शहरवासीयांचे पाणी, वीज व अन्य मुद्द्यांकडील वाढीकडे अथवा त्याबाबतीतील नव्या उपायांकडे लक्ष लागले आहे. शहरातील अनधिकृत जोडण्यांकडे व त्याबाबतीत कारवाई करणाऱ्या योजनांबाबत कोणता निर्णय घेतला जातो, याकडे लक्ष आहे.
चिपळूणकरांवर कर...
By admin | Updated: February 20, 2015 23:14 IST