रत्नागिरी : औद्योगिक केंद्रामध्ये राज्य शासनाच्या मान्यतेने विविध अभ्यासक्रम शिकविण्यात येतात. व्यावसायिक अभ्यासक्रम एक ते दोन वर्षाचे असल्याने रोजगाराची संधी उपलब्ध होईल या आशेने विद्यार्थी प्रवेश घेतात. गतवर्षीपासून प्रवेश प्रक्रिया आॅनलाईन पध्दतीने सुरू करण्यात आली आहे. परंतु वर्गात शिकविण्यासाठी शिक्षकच उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थीवर्ग मात्र हैराण झाला आहे. शहरातील नाचणे रोड येथे असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत १०९४ विद्यार्थी, तर १५० विद्यार्थिनी प्रशिक्षण घेत आहेत. येथे विविध प्रकारचे २५ अभ्यासक्रम शिकविण्यात येतात. सुतारकाम, यांत्रिक डिझेल, शिवणकाम, संधाता, आरेखक स्थापत्य व यांत्रिकी, वीजतंत्री, जोडारी, यांत्रिक उपकरण, यंत्रकारागीर, यांत्रिक मोटारगाडी, तारतंत्री, यांत्रिक प्रशिक्षण व वातानुकूलीकरण आदी १४ प्रकारचे अभ्यासक्रम शिकविण्यात येतात.तसेच पंप आॅपरेटर कम मेकॅनिक, कॉम्प्युटर आॅपरेटर अॅण्ड प्रोग्रॅमिंग, इंटेरिअर डेकोरेशन डिझायनिंग, डेस्कटॉप पब्लीशिंग आॅपरेटर, क्रॉफट्समन फूड प्रॉडक्शन (जनरल), फ्रंट असिस्टंट, आयटीईएसएम, एमएमटीएम, फॅब्रिकेशन सेक्टर बेसीक व अॅडव्हान्स, स्टीवर्ड आदी अभ्यासक्रमही सुरू करण्यात आले आहेत.मुलींच्या औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात शिवणकाम, ड्रेस मेकिंग, हेअर अॅड स्कीन, इन्फरमेशन टेक्नॉलॉजी, फ्रूटस् अॅड व्हेजीटेबल प्रोसेसिंग, कॉम्प्युटर्स आॅपरेटर असे विविध प्रकारचे अभ्यासक्रम शिकविण्यात येतात. काही अभ्यासक्रम १९६९ पूर्वी सुरू झाले आहेत, तर बहुतांश अभ्यासक्रम शासनाने २००० पासून टप्प्याटप्प्याने सुरू केले आहेत. गोरगरीब, सामान्य कुटुंबातील विद्यार्थी अभ्यासक्रम दोन वर्षांत पूर्ण झाल्यावर नोकरी, व्यवसायाची संधी उपलब्ध होईल, यासाठी औद्योगिक केंद्रात प्रशिक्षण घेतात. मात्र, काही ट्रेड शिकविण्यासाठी येथे शिक्षकच उपलब्ध नसल्यामुळे वर्गातून विद्यार्थ्यांचा पुरता गोंधळ सुरू आहे.वातानुकूलीकरण विभागाच्या दोन तुकड्या आहेत. गतवर्षी (२०१३-१४) मध्ये दोन्ही तुकड्यांसाठी एकमेव अध्यापक अध्यापन करीत होते. मात्र, जूनमध्ये त्या अध्यापकांचीही बदली झाल्यामुळे शिक्षक उपलब्ध नाहीत. एका सिनीअर विद्यार्थ्यास काही दिवस शिकविण्याची विनंती करण्यात आली होती. वैयक्तिक कारणामुळे तो विद्यार्थीही निघून गेल्याने विद्यार्थी शिक्षकांच्या प्रतीक्षेत आहेत. पहिले वर्ष संपून लवकरच परीक्षा सुरू होणार आहेत. मात्र, परीक्षेत काय लिहावे, हा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. याबाबत आयटीआय प्रशासनही गंभीर नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याशिवाय पंप आॅपरेटर कम मेकॅनिक, कॉम्प्युटर आॅपरेटर अॅड प्रोग्रॅमिंग, आयटीईएसएमच्या वर्गामध्येही अध्यापक जागेवर नसतात. विद्यार्थी हजेरी झाल्यानंतर इकडे तिकडे बघतात आणि डबा खावून घरी परतात. प्रवेश प्रक्रियेचे काम सुरू असल्याचे कारण सांगण्यात येत आहे. बहुतांश ट्रेडमध्ये यापेक्षा वेगळी स्थिती नाही.वास्तविक प्रवेश प्रक्रिया आॅनलाईन पध्दतीने सुरू झाली आहे. शिक्षकांचा एक ग्रुप प्रमाणपत्र तपासण्यासाठी नियुक्त करण्यात आला आहे. मात्र, अन्य शिक्षक काय करतात, असा सवाल पालकवर्गातून करण्यात येत आहे. व्यावसायिक प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर संबंधित विद्यार्थी बाहेर पडतात. मात्र, त्यांचा अभ्यासक्रम, तसेच प्रॅक्टीकल अपूर्ण राहिल्यामुळे ते कमी पडतात. तातडीने शिक्षकवर्ग नियुक्त न केल्यास तंत्रशिक्षण संचालकांकडे याबाबत दाद मागण्यात येईल, असे काही पालकांनी सांगितले. (प्रतिनिधी)गलथान कारभाराचा विद्यार्थ्यांना फटकाशिक्षकच नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रत्नागिरीचे प्राचार्य पी. आर. बाबर यांच्याशी रात्री उशिरापर्यंत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता भ्रमणध्वनीवर ‘नॉट रिचेबल’ संदेश मिळाल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.-औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत १०९४ विद्यार्थी, तर १५० विद्यार्थिनी.-संस्थेत विविध प्रकारचे २५ अभ्यासक्रम सुरू.-काही ट्रेड शिकविण्यासाठी शिक्षकच उपलब्ध नसल्यामुळे वर्गातून विद्यार्थ्यांचा पुरता गोंधळ.
शिक्षकच नसल्यामुळे विद्यार्थी हैराण
By admin | Updated: August 7, 2014 00:28 IST