प्रकाश वराडकर: रत्नागिरी ,जिल्ह्यातील लाचखोरीचे प्रमाण कमी व्हावे व तळागाळातील सर्वसामान्यांना शासकीय योजनांचा योग्यरित्या लाभ व्हावा, योजनांच्या लाभासाठी नागरिकांना लाच द्यावी लागू नये म्हणून जिल्ह्यातील ९ तालुक्यांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कर्मचारी शासकीय कार्यालयांजवळ साध्या वेशात नागरिकांशी संवाद साधत आहेत. त्यातून लाचखोर अधिकारी, कर्मचाऱ्यांवर खास नजर राहात असून, तक्रारी वाढल्याने कारवाईतही वाढ झाल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरीचे उपअधीक्षक विराग पारकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. संजय गांधी निराधार योजनांसारख्या अनेक योजना शासनातर्फे निराधारांसाठी राबविल्या जातात. त्या योजनांचा लाभ घेणाऱ्यांकडे अनेकदा लाच मागण्याचे प्रकार होतात. अनुदानातूनही पैसे मागितले जातात. त्यामुळे लाभधारक त्रस्त होतात, अशी अनेक प्रकरणे याआधी राज्यात उघडकीस आली आहेत. जिल्ह्यातही असे प्रकार निदर्शनास येत आहेत. याशिवाय उत्पन्नाचा दाखला, जातपडताळणी दाखला यांसारखे विविध दाखले व अन्य कागदपत्रांसाठीही सामान्य शुल्क न आकारता अधिक पैसे मागितले जातात. त्यामुळे हे सर्व प्रकार रोखण्यासाठीच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अधिक सतर्क झाला आहे. पूर्वी लाच मागणाऱ्याविरोधात तक्रार दाखल करायची तर कार्यालयात यावे लागत होते. रत्नागिरीचा विचार करता जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणी विभागाचे कार्यालय आहे. त्यामुळे मंडणगड, दापोली, खेड तसेच अन्य दूरच्या तालुक्यातून या समस्येला बळी पडणारे लोक तक्रार दाखल करण्यासाठी येत नाहीत. त्यामुळे आता या विभागाचे कर्मचारीच जिल्ह्यातील सर्व ९ तालुक्यात दिवसाआड जात आहेत. तेथील कार्यालयांच्या परिसरात येणाऱ्या नागरिकांशी संवाद साधत आहेत. साध्या वेशातील हे पोलीस आपण लाचलुचपत विभागाचे कर्मचारी असल्याची माहिती गुप्त ठेवतात. लाच मागणाऱ्या अधिकारी वा कर्मचाऱ्याकडून आपले काम कसे करून घ्यावे, याचे मार्गदर्शन करतात. त्यानंतर त्यातूनच तक्रारी दाखल होऊन सापळे लावले जातात व लाचखोर त्यात सापडतात. या नव्या पध्दतीचा चांगला उपयोग होत असून, ज्यांना अशा लाचखोरीला सामोरे जावे लागत आहे, त्यांनी या विभागाशी दूरध्वनीवरून संपर्क साधला तरी त्यांच्यापर्यंत विभागाचा कर्मचारी पोहोचून तक्रार घेतल्यानंतर त्याची पंचांसमक्ष पडताळणी करून वरिष्ठांच्या सूचनेनुसार सापळा लावला जातो, असे पारकर म्हणाले. दूरध्वनीप्रमाणेच आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ंूुेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.्रल्ल स्वतंत्र वेबसाइटही सुरू झाली आहे. त्यावर तक्रारदारास आपली तक्रार नोंदविण्याची सोय आहे. तक्रारदाराने त्यावर आपले नाव व संपर्काचा फोन अथवा मोबाईल नंबर देण्याची आवश्यकता आहे. ही तक्रार या वेबसाईटवर केवळ विभागाच्या वरिष्ठांनाच पाहता येते. अन्य कोणालाही ही तक्रार पासवर्डशिवाय दिसू शकत नाही. त्यामुळे तक्रारदाराची माहिती गुप्त राखली जाते. त्यानंतर तक्रारदाराकडे पोहोचून पुढील कारवाईचे नियोजन केले जाते. जानेवारी २०१४ पासूनच्या सहा महिन्यात रत्नागिरी विभागाने (युनिट) जिल्ह्यातील सहा, सिंधुदुर्गमधील २ व कर्जत येथील १ अशा ९ प्रकरणात सापळा लावून आरोपींवर कारवाई केली आहे. खरेतर २७ मे ते २७ जून २०१४ या एका महिन्यातच रत्नागिरीतील या कारवाया झाल्या आहेत. वर्षअखेरपर्यंत तक्रारी व कारवाईचे प्रमाण अधिक असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. खोट्या तक्रारी होतात का, याबाबत बोलताना पारकर म्हणाले, लाचखोरीबाबत सर्वसामान्यपणे तीन प्रकारच्या तक्रारी येतात. खरोखर नाडलेल्यांकडील तक्रारी, व्यक्तीगत वितुष्टातून व आपले काम भीती दाखवूून करून घेण्यासाठीच्या तक्रारी, असे हे तीन प्रकार आहेत. तिसऱ्या प्रकारात व्यक्ती एखाद्या अधिकाऱ्याविरोधात तक्रार दाखल केल्याचा बोलबाला करून आपले काम करून घेतात व तक्रार मागे घेतात, असेही आढळून आले आहे. या तक्रारींबाबत योग्य पडताळणी केल्यानंतर कारवाईबाबत निर्णय घेतला जातो, असे पारकर म्हणाले.
लाचखोर अधिकारी, कर्मचाऱ्यांवर ‘खास नजर’
By admin | Updated: July 9, 2014 00:26 IST