दिनकर चव्हाण-आंबवली -खेड तालुक्यात सातत्याने होत असलेली वृक्षतोड आणि डोंगराळ जमीन सपाटीकरण करण्याचे काम वेगाने सुरू आहे. तसेच वन्यप्राण्यांच्या शिकारीमुळे बिबट्याला जंगलमय भागात भक्ष्य मिळणे दुरापास्त झाले आहे.यामुळे शिकारीला बाहेर पडलेला बिबट्या मानवी वस्तीपर्यंत पोहोचण्याचे प्रमाण वाढले आहे. सन २०१२ ते २०१५ या तीन वर्षात बिबट्याने ५८ शेतकऱ्यांची ९१ जनावरे फस्त केली आहेत. त्यांना नुकसान भरपाईपोटी ३ लाख ९१ हजार रूपयांची मदत वन विभागाकडून देण्यात आल्याची माहिती वनपाल एस. जी. सुतार यांनी दिली आहे. सद्यस्थितीत खेड तालुक्यातील घनदाट जंगलात ४ ते ५ बिबटे असल्याचा दावा वन अधिकाऱ्यांनी केला आहे.खेड तालुक्याचा भौगोलिक विस्तार तसा मोठा आहे. जंगलमय भागामुळे खेड तालुक्याला डोंगराळ भाग म्हणून याअगोदरच घोषित करण्यात आले होते. तालुक्यातील सन २००१ मधील बिबट्यांची संख्या एक अथवा दोन असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले आहे. हीच संख्या सन २०१४-२०१५मध्ये ४ ते ५ असावी, असा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे.२००१ पासून २०१५ दरम्यान बिबट्यांची संख्या वाढली आहे. वडगाव, कांदोशी, कोतवली, शिरगाव, रसाळगड परिसर तसेच रघुवीर घाट आदी ठिकाणच्या जंगलात बिबटे संचार करीत असल्याचे आढळून आले. एका रात्रीत बिबट्या भक्ष्याच्या शोेधात १२ किलोमीटर अंतर फिरतो. १ जनावर फस्त केल्यावर तो महिनाभर शांत बसतो.त्यानंतर पुन्हा हाच बिबट्या शिकारीला बाहेर पडत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सद्यस्थितीत तेथील वनराईची मोठ्या प्रमाणात कत्तल होत असल्याने भक्ष्याच्या शोधार्थ संचार करीत असलेले हेच बिबटे मानवी वस्तीपर्यंत येऊ लागले आहेत. अलिकडच्या काळात मोठ्या प्रमाणात होत असलेली वृक्षतोड व रात्रीच्या सुमारास अनेक वेळा हौसेखातर होत असलेली वन्यप्राण्यांची शिकार यामुळे भक्ष्य शोेधण्यासाठी बिबट्याने आपले लक्ष मानवी वस्तीकडे वळवले आहे. विशेषत: भरणे, खोंडे परिसर तसेच करटेल, कोतवली, आंबवली, शिरगाव, कर्जी आमशेत, अजगणी, मांडवे, घेरासुमारगड, तुळशी, वाडीजैतापुर, आणि शिवतर परीसरात हेच बिबटे रात्रीच्या सुमारास अनेकदा आढळून आले आहेत. तेथील जनावरांची शिकारही त्यांनी केल्याची माहिती वनपाल सुतार यांनी दिली. याबाबत वनविभागाने त्वरीत हालचाल करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात असल्याने बिबट्याचा बंदोबस्त करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.खेड तालुक्यात सध्या ४ बिबटे असल्याची माहिती मिळत असून, जंगलतोडीमुळे या बिबट्यांचा वावर मानवी वस्तीकडे वळू लागला आहे. ग्रामीण भागातील शेतकरीही या प्रकारामुळे हादरले असून, वनविभागाने या शक्यतेला दुजोरा दिला आहे. या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी तसे निवेदनही वनअधिकाऱ्यांना दिले आहे.
बिबट्यांचा मोर्चा मानवी वस्तीकडे
By admin | Updated: July 19, 2015 21:32 IST