चिपळूण : सांस्कृतिक भवन, अमरावती येथे झालेल्या राज्यस्तरीय ज्युनिअर व सिनियर स्पोर्ट डान्स चॅम्पियनशीप स्पर्धेत संघप्रमुख जिल्हाध्यक्षा योगिता खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्ह्यातील नृत्यांगनांनी रत्नागिरीचे नेतृत्व केले. या संघाने नृत्यांचे उत्कृष्ट सादरीकरण करत ३ सुवर्ण, २ रौप्य व २ कांस्य पदकांची कमाई केली. जिल्ह्याच्या संघाचे नेतृत्व करताना २१ वर्षांवरील वयोगटात शास्त्रीय सोलो नृत्य प्रकारात मिताली भिडे सुवर्ण, तर प्रणाली तोडणकर हिने रौप्य पदक मिळवले. शास्त्रीय ड्युएट नृत्य प्रकारात तोडणकर आणि नेहा आंबर्डेकर या सुवर्णकन्या ठरल्या. तसेच २१ वर्षांखालील शास्त्रीय सोलोमध्ये आंबर्डेकर कांस्य व १६ वर्षांखालील शास्त्रीय ड्युएटमध्ये रेणुका पंडित व नेहा जाधव यांनी रौप्य पदक मिळविले. तसेच पाश्चात्य नृत्य प्रकारामध्ये १८ वर्षांखालील सोलोमध्ये क्षितिजा भुंडे हिने सुवर्ण पदक मिळवले. २१ वर्षांवरील वयोगटात अभिजीत मोरे याने कांस्य पदक मिळविले. संकेत घाग व अमर गमरे यांनी नृत्याचे सादरीकरण केले. त्यांना पाश्चात्य नृत्य प्रशिक्षक मोरे, सूरज जाधव व शास्त्रीय नृत्य प्रशिक्षिका मिताली भिडे यांचे मार्गदर्शन लाभले.यावेळी पंच परीक्षेमध्ये भिडे या शास्त्रीय नृत्याच्या परीक्षक, मोरे हे पाश्चात्य नृत्याचे परीक्षक व सूरज जाधव हे पंच म्हणून उत्तीर्ण झाले. यशस्वी नृत्यांगनांची राष्ट्रीय अजिंक्यपदाकरिता निवड करण्यात आली. पंच व नृत्यांगनांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. जिल्हा क्रीडाधिकारी नितीन तारळकर यांनी सर्वांचे अभिनंदन केले. (प्रतिनिधी)
राज्यस्तरावर रत्नागिरी ठरली अजिंक्य
By admin | Updated: February 19, 2015 23:38 IST