रत्नागिरी जिल्ह्याचे भात हे मुख्य पीक आहे. जिल्ह्यातील बहुतांशी भागात जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात जिल्ह्यात ठिकठिकाणी लागवड केलेली भातशेती वाहून गेली. शिवाय पुराचे पाणी भात खाचरात साचले. पाण्यासह चिखल येऊन साचल्याने लागवड केलेल्या भातक्षेत्राचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पाण्याच्या प्रवाहाबरोबर चिखल, दगड येऊन भात खाचरात साचले असल्याने दुबार पेरणीही शक्य झाली नाही. पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिरावून नेला असून, पुरामुळे जिल्ह्यातील २३६९.८५ हेक्टर भातक्षेत्राचे नुकसान झाले आहे. तसेच १४२ हेक्टर फळबागायतींचे नुकसान झाले आहे. एकूण १२ हजार ५०० शेतकऱ्यांचे एक कोटी ७० लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.
यावर्षी पावसाने दमदार सुरूवात केली होती. तौक्ते वादळानंतर सुरू झालेल्या पावसाने थोडी उसंत घेतली होती. मात्र, काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पाऊस पुन्हा सुरू झाल्याने रोहिणी नक्षत्रावरच पेरण्या शेतकऱ्यांनी पूर्ण केल्याने रोपे चांगली वाढल्याने जूनच्या शेवटच्या आठवड्यात शेतकऱ्यांनी लागवडीच्या कामांना प्रारंभ केला. पावसाने विश्रांती घेतली तरी पाणथळ, मळेशेती व त्यानंतर पावसाच्या पाण्यावर लवकर निचरा होणाऱ्या वरकस जमिनीवर लागवड करण्यात आली. जुलैमध्ये शेवटच्या आठवड्यात भात लागवडीची कामे पूर्ण करण्यात आली होती. जिल्ह्यात सरासरी ३,५९१ मिलिमीटर पाऊस पडत असल्याने ६९ हजार ४७ हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड करण्यात आली आहे. दुय्यम पीक म्हणून नागली लावण्यात येत असून, १० हजार ९८ हेक्टर क्षेत्रावर नागली लागवड करण्यात आली आहे. १.४९ हेक्टर क्षेत्रावर कडधान्य, ०.६३ हेक्टर क्षेत्रावर गळितधान्य तसेच ०.४७ हेक्टर क्षेत्रावर तृणधान्य लागवड केली आहे.
संततधार पावसामुळे खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर तालुक्यांतील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. नद्यांना पूर आल्याने पुराचे पाणी नदी किनाऱ्यालगतच्या गावांमध्ये शिरले होते. नागरी वस्तीमध्ये पाणी शिरल्याने मालमत्तेचे नुकसान तर झाले शिवाय भातशेती, फळबागायतीचेही नुकसान झाले आहे. भात लावणीची कामे पूर्ण होताच, पूर आल्याने भातशेती वाहून गेली. पुराच्या पाण्यासह माती, दगड भात खाचरात येऊन साचले. त्यामुळे लागवड केलेल्या शेतीचे नुकसान झाले. पूर ओसरल्यानंतर कृषी विभागाकडून नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे करण्यात आले. जिल्ह्यातील २३६९.८५ भात क्षेत्राचे, १४२ बागायती पुरामुळे बाधित झाल्या आहेत. १२ हजार ५०० शेतकऱ्यांचे एक कोटी ७० लाखांचे नुकसान झाले आहे.
चिपळूण, खेड, संगमेश्वर तालुक्यात बाधित क्षेत्र अधिक आहे. पूरग्रस्त भागात तेरा दिवस भातशेती पाण्याखाली राहिल्यामुळे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात बाधित क्षेत्राचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील तालुकानिहाय बाधित शेती (हेक्टर), पुढीलप्रमाणे:
तालुका एकूण क्षेत्र बाधित क्षेत्र
मंडणगड ४८९५ ४.९२
दापोली ७०९२ १४.५०
खेड १०२५१.२४ ८५६.२४
चिपळूण १०२४२.६६ ६७१.३२
गुहागर ५८२८ ५.४१
संगमेश्वर ११५८८.१५ ४७७.९५
रत्नागिरी ७६२४ ११०.६९
लांजा ७२२४ ५१.५४
राजापूर ८६०० १७७.२८
एकूण ७३३९३.०५ २३६९.८५
-----------------
पुरामुळे जिल्ह्यातील बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्याचे काम पूर्ण झाले असून, अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे. जिल्ह्यातील १२ हजार ५०० शेतकऱ्यांचे एक कोटी ७० लाखांचे नुकसान झाले आहे. शासनाकडून नुकसानभरपाई जाहीर झाली की, शेतकऱ्यांना वितरीत केली जाणार आहे.
- शिवराज घोरपडे, जिल्हा कृषी अधीक्षक, रत्नागिरी