कडवई : संगमेश्वर तालुक्यातील कोंडउमरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ढिसाळ नियोजनाचा फटका ग्रामस्थांना बसत आहे. ज्यांनी कोविड प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा घेतली आहे, त्यांना दुसऱ्या मात्रेसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे हाल होत आहेत.
दुसऱ्या शिबिराला प्रतिसाद
रत्नागिरी : तालुक्यातील खेडशी ग्रामपंचायत येथे लसीकरणाच्या दुसऱ्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रभाग क्रमांक १ मध्ये हे शिबिर नुकतेच घेण्यात आले. यावेळी कोविशिल्डचे १०० डोस लाभार्थींना देण्यात आले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिवसेनेचा भगवा फडकला
मंडणगड : तालुक्यातील घोसाळे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पाचरळ गावातील शिवसेनेचे मनोज पवार यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख प्रताप घोसाळकर, सभापती स्नेहल सपकाळ, उपसभापती प्रणाली चिले, माजी सभापती आदेश केणे व अन्य उपस्थित होते.
नादुरुस्त मीटर बदलाकडे दुर्लक्ष
रत्नागिरी : महावितरणकडून बसविण्यात आलेले विद्युत मीटर अनेकवेळा नादुरुस्त होतात. हे नादुरुस्त मीटर वारंवार कळवूनही दुरुस्त केले जात नाहीत, असे ग्राहकांचे म्हणणे आहे. महावितरणकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने ग्राहकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
कारवाईची मागणी
रत्नागिरी : तालुक्यातील हरचेरी - रोहिदासवाडी येथे ५ लाख रुपये खर्च करुन दलित वस्ती सुधारणा योजनेंतर्गत बांधलेले गटार बेकायदेशीरपणे तोडण्यात आले. त्यामुळे येथील रहिवाशांनी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्याकडे संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.