चिपळूण : महाराष्ट्र शासन कृषी विभागातर्फे राष्ट्रीय कृषी पीक विमा योजना कोकणात सुरु करण्यात आली आहे. भात व नागलीचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी रघुनाथ सरतापे यांनी केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरु शकतात. योजनेत सर्व कर्जदार, बिगर कर्जदार शेतकरी भाग घेऊ शकतात. विमा रकमेची व्याप्ती वाढवून त्याची सांगड उत्पन्न व किमान आधारभूत किमतीशी घालण्यात आली आहे. ६० टक्के जोखीम स्तरावरुन भातपिकासाठी १५ हजार ८४०० विमा रक्कम २.५० टक्के हप्त्याप्रमाणे ३८५ रुपये प्रतिहेक्टर त्याचप्रमाणे ८० टक्के जोखीम स्तरानुसार नाचणी पिकासाठी १३ हजार १०० रुपयांसाठी २.५० टक्के हप्त्याप्रमाणे रुपये ३२७.५० प्रतिहेक्टर रक्कम भरायची आहे.ज्या भात शेतकऱ्यांना जास्त रक्कम विमा संरक्षित करावयाची आहे. त्यांच्यासाठी उंबरठा उत्पन्नात १५० टक्केपर्यंत अतिरिक्त संरक्षण घेता येणार आहे. यासाठी अतिरिक्त हप्ता १५ टक्के द्यावा लागणार आहे. म्हणजे एकूण ३८ हजार ५०० रुपये प्रतिहेक्टर संरक्षित होण्यासाठी ५ हजार ७५ रुपये तसेच नागली पिकासाठीदेखील अतिरिक्त संरक्षण रुपये २४ हजार ५०० पर्यंत मिळेल. याकरिता अतिरिक्त १२ टक्के विमा द्यावा लागेल. प्रतिहेक्टरी संरक्षण रकमेसाठी २ हजार ९४० रुपये विमा हप्ता भरावा लागणार आहे. कर्जदार, बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी राष्ट्रीयीकृत बँका किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे ३१ जुलैपूर्वी विमा प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. भात व नागली पीक विमा हप्त्यात अल्प तसेच अत्यल्प भूधारकांना विमा हप्त्यात १० टक्के सूट मिळणार आहे. शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, कृषीसेवक, मंडल कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (वार्ताहर)शासनाच्या कृषी विभागातर्फे कृषीपीक विमा योजना सुरू. विविध पिकांसाठी विमा रक्कम प्रमाण ठरलेले. शेतकऱ्यांना जास्त रक्कम विमा संरक्षित करायची आहे त्यांच्यासाठी विशेष संकल्प. प्रतिहेक्टरी संरक्षण रकमेसाठी ठराविक रक्कम मंजूर. शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी विविध प्रयत्न सुरू. कृषी अधिकाऱ्यांकडून सहाय्य.
शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय कृषी पीक विमा योजना
By admin | Updated: July 18, 2015 00:14 IST