‘स्वतंत्रता’ हे मानवीय मूल्यांच्या ‘जपणुकीचा’ आणि सामूहिक ‘सहजीवनाच्या’ विकासकाचा आरोग्यदायी, उपकारक, प्रेरक आणि उत्साह याचा शाश्वत ठेवा आहे. ‘अस्मिता’ आणि ‘अस्तित्व’ यातून नैसर्गिक ‘कार्यक्षमता’ बहरते. म्हणूनच एखादा कवी स्वातंत्र्याचा जयघोष करण्यासाठी, त्याच्या अस्मितेला जपण्यासाठी, त्याच्या अस्तित्वाची ग्वाही जगभर देण्यासाठी अत्यंत मार्मिक गाणं लिहून जातात. म्हणतात... ‘दिल दिया है, जाँ ऽऽ भी देंगे ऽऽ ये वतन तेरे लिये...!’’ हे आणि अशी अनेक गाणी आजच्या दिनी किंवा पूर्व संध्येला किंवा आदल्या दिवशी सर्व माध्यमातून गुंजन करतात. मन रोमांचित करतात. स्फूर्ती देतात. उत्साहाचे उधाण असतं आणि १५ ऑगस्ट स्वतंत्र भारत माता याचा जयघोष करीत स्वतंत्र भारताच्या अस्तित्वाचा ध्वज. ‘विजय विश्व तिरंगा प्यारा झेंडा ऊँचा रहे हमारा...’ गुंजारव करतात, आकाशात तो दिमाखाने फडकतो. तेव्हा भारतीय मन आणि शरीर एका विशिष्ट रसायनाने मोहरून उठतं. असा एकही भारतीय माणूस, ही अनुभूती अनुभवत नाही, असा या भारत भू वर नाही. हीच तर प्रसन्न आरोग्याचा शिडकाव करते. हा राष्ट्रीय सणाचा उत्कट क्षण, एका अत्युच्च अस्मिता, अस्तित्व, सामूहिकत्व, राष्ट्रीय एकात्मत्व याचं एक पक्क रसायन असतं. हेच आपलं सुरक्षा कवच असतं. सार्वभौमत्व असतं. म्हणूनच जिथे जिथे भारतीय माणूस आहे. तो या उत्सवाची आतुरतेने वाट पहातो. या राष्ट्रीय सणाच्या दिवशी आपल्या अस्तित्वाचे आरोग्य अत्युच्च शिखराच्या आनंदाच्या ठेव्यात अनुभवतो. जगभर या भारतभूच्या या सणानिमित्त शुभेच्छा आणि अभिनंदनाचा राष्ट्रीय सोहळा बहरून उठतो.
हा दिवस संकल्प करण्याचाही असतो. वर्षभर देशासाठी केलेल्या कार्याची उजळणी करण्याचाही असतो. म्हणूनच भारताच्या राजधानी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून पंतप्रधान महोदय आपल्या संकल्पांचा, राष्ट्रहिताच्या गुजगोष्टींचा गुंजारव करतात. वर्षभर त्याचा पाठपुरावा करण्याची ताकद या गुंजारवात असते. अनेकदा ते एकता, यही भारत की विशेषत:, प्रत्येक राज्याच्या राजधानीत मुख्यमंत्री आणि शासकीय कार्यालये, संस्थात्मक कार्यालये, इत्यादी सर्व ठिकाणी आपल्या या अस्तित्वाच्या, अस्मितेच्या ‘झेंडे को सलामी दो...! च्या रोमांचक ऐकोप्याच्या ललकारीने संपूर्ण परिसर, आसमंत, त्यांची मने चैतन्याने भारावून जातात, राष्ट्रीयत्वाने मोहरून उठतात आणि एक सूर, एक लय, एक ताल आणि एकच भारतीय मन याने एकत्वाचे राष्ट्रीय गान सुरू होतं...‘जन-गन-मन-अधिनायक जय हे...!’ आणि प्रत्येक जन मन स्तब्ध होतं. हात सॅल्युटसाठी उठतात. भारत माता की जय असा जयघोष होतो. पुढील आनंददायी कार्यक्रम इत्यादी सुरु होतात. किती-किती आल्हाददायक आहे हे, आरोग्यदायी आहे, हे !
हा आपल्या देशाचा वाढदिवस असतो. २६ जानेवारी हा ही गणतंत्र दिवस असतो. हे दोन राष्ट्रीय सण भारतीय सार्वभौमत्वाचे उत्सव आहेत. या दिवशी शक्यतो कुणीही आंदोलन, धरणे, काळ्या फिती लावून काम करत नाहीत. करू नये. आपण आपल्या आप्त स्वकियांचा वाढदिवस आनंदात साजरा करतो. हा तर राष्ट्रीय अस्मितेचा शुभक्षण आहे. वाढदिवस आहे. कारण हा उत्कट आनंदाच्या क्षणांचा, सार्वविकासक शक्तीच्या प्रेरणेचा असतो. हा दिवस संकल्प, प्रेरणा, उत्साह, कर्तव्य, सामुहिकता, एकता निर्मिती या संस्कारांचा सण असतो. या देशाच्या राष्ट्रीय अस्मितेत, अस्तित्वात सर्वांच्या गरजा भागवण्याचं सामर्थ्य आहे. त्याची आठवण करून घेणे याचाही हा दिवस आहे. म्हणूनच तर ‘जहाँ डाल डाल पर सोने कि चिडिया करती है, बसेरा वो भारत देश है, मेरा’ किंवा ‘मेरे देश की धरती सोना उगले, उगले, हिरे मोती’ सारखी गाणी आपणास रोमांचित करतात. हेच तर राष्ट्रीय आरोग्याचे गाणं आहे. म्हणून एक सुरात आणि एक दिलाने म्हणतो ‘भारत माता की जय...!’
- डॉ. दिलीप पाखरे, रत्नागिरी