सागर पाटील-टेंभ्ये -मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी राज्यामध्ये सुरु आहे. असे असताना सध्या सर्वत्र डोनेशनचा घोडेबाजार सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे ६ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याच्या शासनाच्या योजनेचे अक्षरश: तीनतेरा वाजल्याचे पाहायला मिळत आहे. केवळ शासकीय शाळांमध्येच या नियमाची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसते. अन्यत्र मात्र प्रवेशासाठी शाळेला मदतीच्या स्वरुपात खुलेआम डोनेशन मागितले जात आहे.पाल्याला दर्जेदार व चांगले शिक्षण मिळावे, यासाठी प्रत्येक पालकाची धडपड सुरू असते. विशिष्ट अशा नामांकित शाळांमध्ये प्रवेश मिळावा, यासाठी पालक जीवाचे रान करत असतात. या सर्व प्रयत्नांमध्ये पालकाला डोनेशनला बळी पडावे लागते. सध्या के. जी. पासून कोणत्याही वर्गात प्रवेश पाहिजे असेल तर शाळेला मदतीच्या स्वरुपात डोनेशन मागितले जाते. हे डोनेशन मध्यस्थामार्फत निश्चित होेते. मराठी माध्यमासाठी दहा ते पंधरा हजार, तर इंग्रजी माध्यमासाठी जवळपास पंचवीस हजार रुपयांपर्यंत मदत मागितली जाते. यावेळी शासनाच्या शुल्क निर्धारण कायद्याचा विचार केला जात नाही. वास्तविक अनुदानित व विनाअनुदानित या दोन्ही प्रकारच्या शाळांना ६ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना मोफत शिक्षण देणे सक्तीचे आहे. परंतु विनाअनुदानित शाळांना शासनाकडून कोणतेही अनुदान मिळत नसल्याने शाळेचा खर्च भागवण्यासाठी तसेच शिक्षकांना पगार देण्यासाठी पालकांकडून मदत घ्यावी लागते, असे काही संस्थांचे पदाधिकारी पालकांना खुलेआम सांगतात. या सर्व प्रकारामुळे पालकवर्गाची मात्र मोठ्या प्रमाणात दमछाक होताना दिसत आहे.शहरातील शाळेमध्ये अथवा इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये आपल्या पाल्याने शिक्षण घ्यावे, या पालकांच्या हट्टामुळे खेडेगावातील मराठी माध्यमाच्या बहुतांश शाळा मात्र ओस पडत असल्याचे दिसत आहेत. ग्रामीण भागातील शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण देवूनदेखील आपले अस्तित्व टिकवण्यासाठी येथील शाळांना मोठ्या प्रमाणात संघर्ष करावा लागत आहे.या शाळा विद्यार्थ्यांनी आपल्याकडे प्रवेश घ्यावा म्हणून एस. टी. पास, गणवेश यांसारख्या अनेक सुविधा विद्यार्थ्यांना देतात. त्यामुळे एकीकडे डोनेशनसाठी चढाओढ, तर दुसरीकडे प्रवेशासाठी चढाओढ हे चित्र बदलणे आवश्यक आहे. पालकांनी कोणत्याही प्रकारे डोनेशनच्या प्रकाराला बळी पडू नये, असे आवाहन शिक्षण विभागाकडून केले जात आहे. परंतु काही प्रमाणात प्रतिष्ठा व काही प्रमाणात इंग्रजी माध्यमाच्या फेऱ्यात अडकलेल्या पालकांचे शहराचे आकर्षण कमी होईल, असे वाटत नाही.
मोफत शिक्षणाचे वाजले की बारा
By admin | Updated: April 13, 2015 00:06 IST