लाेटे औद्याेगिक वसाहतीतील घरडा केमिकल्स कंपनीतील दुर्घटनेची चाैकशी करण्याची वैभव खेडेकर व संजय कदम यांनी केली आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
खेड : लाेटे औद्याेगिक वसाहतीतील घरडा केमिकल्स कंपनीतील स्फोटाची चौकशी करून कंपनी व्यवस्थापनावर गुन्हे दाखल करावेत. त्याचबराेबर दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावे, अशी मागणी खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर आणि माजी आमदार संजय कदम यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी खेडचे उपविभागीय अधिकारी अविशकुमार साेनाेने यांच्याकडे दिले आहे.
घरडा केमिकल्स कंपनीत शनिवारी सकाळी स्फाेट हाेऊन त्यामध्ये चार कामगारांचा मृत्यू झाला. तर एकाची प्रकृती गंभीर जखमी झाला आहे. या दुर्घटनेनंतर परिसरातून संतप्त भावना व्यक्त हाेत आहेत. या भीषण स्फोटासंबंधी माजी आमदार संजय कदम व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस व खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनीही गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी या दुर्घटनेची चाैकशी करण्याची मागणी करणारे निवेदन खेडचे उपविभागीय अधिकारी अविशकुमार सोनोने यांच्याकडे दिले आहे.
या भीषण स्फाेटामध्ये चाैघांचा मृत्यू झाला आहे. काहीजण जखमी झाले आहेत. कंपनीच्या वायुगळतीमुळे हा स्फोट झाला असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. कंपनीतील अशा वायुगळतीमुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. घरडा केमिकल्स कंपनीच्या प्रदूषणामुळे परिसरात कॅन्सरसारख्या रोगाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत, असेही त्यांनी या निवेदनात म्हटले आहे. या स्फोटाची गंभीरतेने चौकशी करून कंपनी व्यवस्थापनावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.