हवामानावर आधारित पंतप्रधान पीक विमा योजना खरीप हंगामासाठी लागू करण्यात आली. भात व नागली पिकांचा विमा योजनेत समावेश करण्यात आला. मात्र, विमा परतावा प्राप्त होत नसल्याने या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अत्यल्प होती. मात्र, दोन वर्षांपूर्वी कापणी केलेले भात पुराच्या पाण्याने वाहून गेल्याने शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई जाहीर करण्यात आली होती. जिल्ह्याचे उंबरठा उत्पन्न ७० टक्केपेक्षा अधिक आहे. ५० टक्के पेक्षा उत्पन्न कमी असल्याचा निकष विमा योजनेसाठी ग्राह्य धरण्यात येत असल्याने उंबरठा उत्पन्नामुळे जिल्ह्यातील शेतकरी वंचित राहत होते. मात्र गेल्या दोन वर्षात पूर, चक्रीवादळ यामुळे पिकाचे होत असलेले नुकसान यामुळे शेतकरी जागृत झाले असून, विमा योजनेकडे कल वाढू लागला आहे. सुरूवातीला दि. १५ जुलैपर्यंत विमा योजनेत सहभागी होण्यासाठी व एकही शेतकरी वंचित राहू नये यासाठी मुदतवाढ देण्यात आल्याने लाभार्थींची संख्या दुप्पटीने वाढली आहे. ७५४.८१ हेक्टर विमा संरक्षित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे.
गतवर्षीच्या तुलनेत शेतकऱ्यांची संख्या दुप्पट
गतवर्षी १३०० शेतकरी विमा योजनेत सहभागी झाले होते. मात्र २५० शेतकऱ्यांना १४ लाखाचा परतावा प्राप्त झाला होता. दि. १५ जुलैपर्यंत १७६८ शेतकरी विमा योजनेत सहभागी झाले होते. मात्र, मुदवाढीमुळे संख्या वाढली आहे. भातासाठी ३५११, नागलीसाठी १४० शेतकरी विमा योजनेत सहभागी झाले आहेत. त्यामध्ये ४२२ कर्जदार व ३,२२९ बिगरकर्जदार शेतकऱ्यांचा समावेश आहे.
---------------------
२१४ शेतकऱ्यांचे पंचनाम्यासाठी अर्ज
पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत खरीप हंगामात जिल्ह्यातील ३,६५१ शेतकऱ्यांनी विमा उतरवला होता. पैकी विमाधारक २१४ शेतकऱ्यांनी नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करण्याचे अर्ज सादर केले होते. नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले असून, नुकसानग्रस्त विमाधारक शेतकऱ्यांना विमा योजनेचा लाभ मिळणार आहे.
---------------------
उत्पन्नाचा निकष आड
जिल्ह्याचे भाताचे उंबरठा उत्पन्न ७० टक्केपेक्षा जास्त आहे. नुकसानासाठी ५० टक्केपेक्षा कमी उत्पन्न ग्राह्य धरले जात असल्याने येथील शेतकऱ्यांचे नुकसान होत होते. मात्र, दोन वर्षांपूर्वी कापलेल्या पिकाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई देण्यात आली होती. पेरणी ते कापणीपर्यंतचे नुकसान ग्राह्य धरले जात असल्याने विमा योजनेमुळे आर्थिक हातभार लागत आहे. अटी शिथील केल्यामुळेच प्रतिसाद वाढू लागला आहे.
------------------------------
दरवर्षी खरीप तसेच फळपीक विमा योजनेत सहभागी होत दरवर्षी केवळ पैसे भरत राहणे शक्य नाही. हवामानातील बदलामुळे पिकाचे होणारे नुकसान लक्षात घेत विमाधारकांना परतावा प्राप्त होणे आवश्यक आहे. गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यातील खरीप हंगामातील नुकसान ग्राह्य धरले जात असून, शेतकऱ्यांना परतावा प्राप्त होत आहे. मात्र निकषात सुधारणा होणे आवश्यक असून, सरसकट सर्व शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणे गरजेचे आहे.
- प्रवीण शिंदे, शेतकरी
पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी शेतकरी व विमा संरक्षित क्षेत्र पुढीलप्रमाणे :
तालुका शेतकरी विमा संरक्षित क्षेत्र
मंडणगड ६९८ ११३.६४
दापोली २४१ ४९.४२
खेड २७९ ८९.१७
चिपळूण २६३ ६९.६९
गुहागर २०६ ६०.८७
संगमेश्वर ४७५ ८३.७८
रत्नागिरी ९५४ १५७.४६
लांजा २०० ५१.०४
राजापूर ३३५ ७७.७२
एकूण ३६५१ ७५४.८१