मेहरुन नाकाडे -रत्नागिरी , ‘मी न माझा मी तयाचा, ताल मीच, मी सुरांचा... चातक मज, सूर तहान... नादब्रह्म मम निदान...’ या काव्यपंक्तीप्रमाणे रंगमंचावरील अभिनय व गाणे सादर करताना मी स्वत:ला विसरतो. गाणे व अभिनयामुळेच किडनी कॅन्सरसारख्या दुर्धर आजारातून बाहेर पडणे सोपे झाले. ही कला समाजाने स्वीकारली आणि म्हणूनच आपल्याला ओळख मिळाली. एकूणच कोणताही कलाकार हा समाजामुळेच घडतो, असे आनंद प्रभूदेसाई यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.देवगड तालुक्यातील जामसंडे गावात जन्मलेले आनंद प्रभूदेसाई यांना गाण्याची विलक्षण आवड. गावात शाळा असतानाही संगीत शिक्षणासाठी पाच किलोमीटरची दररोज पायपीट करीत असत. त्याकाळी झापांचे आच्छादन असलेल्या रंगमंचावर, पेट्रोमॅक्सच्या उजेडात राम मराठे, वसंत देशपांडे, बालगंधर्व यांची नाटकं पाहायला आजोबांसमवेत जात असत. घरी गरिबी असतानाही नाटकाची आवड त्यांच्यामध्ये निर्माण केली गेली. नववीपर्यंत संगीत विषय होता. महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना त्यांना गोव्याचे माजी शिक्षणमंत्री व प्राचार्य गोपाळराव मयेकर यांचे प्रोत्साहन मिळाले. त्यामुळेच वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यानंतर शासकीय नोकरी मिळत असतानाही त्यांनी ती स्वीकारली नाही. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे संगीतामध्ये पदवीसाठी प्रवेश घेतला आणि प्रथम श्रेणी मिळवली. यावेळी जयमाला शिलेदार यांच्याबरोबर काम करण्याची संधी त्यांना मिळाली. त्यानंतर आपण जिल्हा परिषद, रत्नागिरीमध्ये नोकरीला रूजू झाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नगरपरिषदेने आयोजित केलेल्या संगीत नाटकांमध्ये प्रथम पारितोषिक मिळाले. त्यानंतर समर्थ रंगभूमीच्या माध्यमातून सं. सौभद्रमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर मनोज कोल्हटकर, वैभव मांगले, समीर इंदुलकर यांच्या समवेत काम करण्याची संधी मिळाली. १९९५ पासून गायक, नट म्हणून सं. ‘स्वरयात्री’त काम केले. त्यानंतर सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रम्ह, सं. राधामानस, सं. ऐश्वर्यवती या नाटकांतून काम करताना राज्यस्तरीय पारितोषिके मिळाली. संबंधित नाटकांचे प्रयोग मुंबई, दिल्ली, मध्यप्रदेश, गोवा येथे झाले. ‘सं कट्यार काळजात घुसली’ यामधील खॉसाहेबाची भूमिका तर सर्वांनाच भावली. पुण्या, मुंबईतील प्रेक्षकांनी तर नाटक डोक्यावर घेतले. या भूमिकेसाठी बालगंधर्व गुणगौरव पुरस्कार मिळाला. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या उपस्थितीत सादर केलेल्या ‘घेई छंद मकरंद प्रिय हा मिलिंद’ या खॉसाहेबाच्या गाण्यास वन्समोअर मिळाला. ही माझ्यासारख्या कलाकारासाठी मिळालेली पोचपावती आहे. त्यामुळे मिळालेला हा पुरस्कार कुटुंब, सहकलाकार, रसिकांचाच असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.गाण्यामुळेच वेदना विसरलोम्युझिक थेरेपीचीही वेगळी किमया आहे. त्यामुळेच जेव्ही किडनी काढण्याचे आॅपरेशन झाले तेव्हा मी डॉक्टरांना विनंती करून ‘पं. भीमसेन’ ऐकत होतो. ३२ टाक्यांचे आॅपरेशन असतानादेखील आॅपरेशनच्या दुसऱ्या दिवसापासून छोट्या तानपुऱ्यावर गाणे गायचो. गाण्यामुळेचे मी माझ्या वेदना विसरलो. आजही दररोज न चुकता रियाज करतो. संगीतामुळेच मी आॅपरेशननंतर चौथ्या महिन्यात सकाळी डोंबिवलीत व सायंकाळी पुणे येथे नाटकाचे सलग दोन प्रयोग सादर करू शकलो. हा आत्मविश्वास मला जगण्याची नवी उर्मी देऊन गेला.
समाजानेच घडवला माझ्यातील कलाकार
By admin | Updated: July 28, 2014 23:20 IST