रत्नागिरी : राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत एकात्मिक भात उत्पादक कार्यक्रम जिल्ह्यात राबवण्यात आला. भात पिकाच्या रक्षणासाठी ७५ हजार ६०० रक्षक सापळे मागविण्यात आले. त्यासाठी ८ लाख ३१ हजार ६०० रूपये खर्च करण्यात आला. या रक्षक सापळ्यांचा पुरवठा भात कापणीनंतर करण्यात आल्याने कृषी कार्यालयाच्या गोडाऊनमध्ये सापळे पडून आहेत. रत्नागिरी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातर्फे २०१४-१५साठी एकात्मिक भात उत्पादन कार्यक्रमातंर्गत भात पीक प्रात्यक्षिके घेण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यात भात पिकावर प्रामुख्याने, तुडतुडा, लष्करी अळी, खोडकिडा सारख्या किडीचा प्रादूर्भाव प्राधान्याने होत असतो. या किडीवर कीटकनाशकांची फवारणी करून नियंत्रण मिळवले जाते. त्यासाठी रक्षक सापळ्यांची आवश्यकता नाही. शिवाय रत्नागिरी जिल्हा भौगोलिकदृष्ट्या डोंगर दऱ्यांमधून वसलेला आहे. त्यामुळे गुंठ्यागुंठ्यांच्या प्लॉटस्मध्ये शेती करण्यात येते. वास्तविक रक्षक सापळ्यांची आवश्यकता नसतानासुध्दा त्यासाठी लाखो रूपये खर्च करण्यात आले. शिवाय लाखो रूपये खर्च करून मागवण्यात आलेले सापळे अद्याप पडून आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात प्रत्येक तालुकानिहाय १८९० प्रात्यक्षिके घेण्यात आली. भाताच्या संरक्षणासाठी फेरोमन, लुर्स, स्टिकी पध्दतीचे सापळे मागविण्यात आले. संबंधित तीन प्रकारच्या एकूण ७५ हजार ६०० सापळ्यांसाठी ८ लाख ३१ हजार ६०० रूपये खर्च करण्यात आला. वास्तविक संबंधित सापळे जून, जुलैमध्ये शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात आॅक्टोबरमध्ये सापळ्यांचा पुरवठा झाल्याने ते शेतकऱ्यांपर्यत पोहोचू शकलेले नाहीत. वास्तविक रक्षक सापळ्यांची गरज नसताना देखील सापळे मागवण्यात आले. शिवाय उशिरा पुरवठा झाल्याने सापळे पडून आहेत. त्यामुळे संबंधित बाबींवर विनाकारण खर्च करण्यात आल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)
‘रक्षक’चे ८ लाख पाण्यात
By admin | Updated: February 15, 2015 00:47 IST