- विजय मांडे, कर्जत
कर्जत नगरपालिकेची पाणीपुरवठा योजना १० वर्षांपूर्वी १४ कोटी १३ लाख रु पये खर्च करून पूर्ण करण्यात आली. २२ वर्षे रखडलेली ही पाणी योजना ‘लोकमत’च्या पाठपुराव्याने व लोकांच्या रेट्याने कार्यान्वित झाली. परंतु दररोज पेज नदीपात्रातून सात एमएलडी म्हणजे सुमारे ७० लाख लीटर पाणी उचलले जाते, मात्र प्रत्यक्षात केवळ २७ ते २८ लाख लीटर पाणीच नागरिकांपर्यंत पोहोचते. उर्वरित ४२ लाख लीटर म्हणजे ६० टक्के पाणी कुठे मुरते, त्याची गळती किती होते, चोरी किती होते, हे शोधणे गरजेचे आहे. या प्रकारामुळे पाणीपट्टीची दरवाढ होऊन नागरिकांना नाहक आर्थिक भुर्दंड पडतो. यापुढील महायुद्धे पाण्यासाठी होतील, अशी भाकिते काही वर्षांपूर्वी केली गेली. त्यावेळी ती भाकिते करणाऱ्यांना वेड्यात काढण्यात आले होते, परंतु आता त्या दृष्टीने परिस्थिती होऊ लागली आहे. या नदीचे पाणी पळव, त्या धरणातील पाणी अन्य ठिकाणी ने असे प्रकार सुरू झाल्याने ‘तो’ दिवस दूर नाही असे वाटू लागले आहे. संपूर्ण योजनेचा अभ्यास करून मनसेने तशा प्रकारचा अहवाल तयार करून नगर परिषदेला निवेदन दिले, तरीही त्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा निवेदने देण्यात आली, परंतु अद्याप काहीही झाले नाही. पाणी योजनेची सद्य:स्थिती सादर करताना मनसेने आपल्या निवेदनात ४२ लाख लीटर पाणी वाया किंवा चोरीस जात असताना त्याचा भुर्दंड अन्य नागरिकांना का? असा प्रश्न उपस्थित के ला आहे. शिवाय ७० लाख लीटर पाणी आणण्यासाठी १८ ते २० तास पंप चालवावे लागतात. त्यांच्या देखभालीकडेही दुर्लक्ष होते. नाहक जास्त तास पंप चालल्याने विजेचे बिलही वाढते. वसुली सुद्धा १०० टक्के होत नाही. ६० टक्क्यांवर वसुली गेली नाही. त्यामुळे पाणीपट्टी वाढवूनही ही योजना दरवर्षी सुमारे एक कोटी रु पये तोट्यात आहे. २००६ मध्ये कर्जतची वाढीव पाणीपुरवठा योजना पूर्ण झाली. त्यावेळी विरोध असताना सुद्धा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून ही योजना त्रुटी असतानाही नगरपालिकेने ताब्यात घेतली आणि तेथपासून ती तोट्यात आहे. आता तर तिचा तोटा कोटी रु पयांच्या घरात गेला आहे. तो भरून काढण्यासाठी शासनाच्या परिपत्रकाचा आधार घेऊन पाणीपट्टी वाढ करण्यात येते. हा त्यावरील उपाय नाही. पाणीपट्टीवाढीला नागरिकांचा विरोध नाही, परंतु अनधिकृत नळजोडण्या, गळती व कथित चोरी याला आळा घालण्याची आवश्यकता आहे. पाणी मुरते कु ठे ?दररोज पेज नदीपात्रातून सात एमएलडी म्हणजे सुमारे ७० लाख लीटर पाणी उचलले जाते, मात्र प्रत्यक्षात केवळ २७ ते २८ लाख लीटर पाणीच नागरिकांपर्यंत पोहोचते. उर्वरित ४२ लाख लीटर म्हणजे ६० टक्के पाणी कुठे मुरतेपाणी योजना पूर्ण करताना अनेकांनी प्रयत्न केले, परंतु कर्जत नगर परिषदेकडून गळती व होणाऱ्या पाणीचोरीवर अद्याप उपाय होत नाही. त्यामुळे नागरिकांना पाणीपट्टीवाढीला तोंड द्यावे लागते. आम्ही पाणी योजनेबाबतची माहिती उपलब्ध करून घेतली आहे व तसे जिल्हाधिकारी आणि मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे दिली आहे, परंतु काहीही होत नाही. आमची माहिती सिद्ध करण्याची जबाबदारी संपूर्णपणे आमची राहील.- प्रवीण गांगल, सचिव, रायगड जिल्हा मनसे नगर परिषदेच्या विविध योजनांमधून निधी उपलब्ध करून गळती काढण्यासाठी प्राधान्य दिले जाईल तसेच पाण्याची चोरी होत असल्यास त्याबाबत चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल.- दादाराव अटकोरे, मुख्याधिकारी, कर्जत नगर परिषद